टॉलस्टॉय ( 1828-1910 ) यांनी आपल्या वेगवेगळ्या कार्याने व भूमिकांनी 19 व्या शतकात आपले नाव अजरामर करून ठेवले. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. याचे कारण म्हणजे त्यांना दिसून आले की त्या धर्माचे धर्माचार्य मोठमोठी भाषणे द्यायचे, प्रेम व क्षमा यांच्या सिद्धांतावर लांब पल्लेदार चर्चा करायचे, पण त्यांचे आचरण व त्यांची वागणूक मात्र नेमकी त्याच्या विपरीत असायची. शेवटी टॉलस्टॉय आपले राजेशाही वैभव सोडून गरीब शेतकरी व शेत मजूरांसोबत येऊन गावात राहू लागले. त्यांच्या सारखेच जीवन जगू लागले. तेव्हा त्यांच्या मनाला शांती मिळाली. एका झोपडीत राहून दिवसभर जोडे शिवण्याचे काम करून ते आपला उदरनिर्वाह चालवीत असत. पूर्णपणे सात्विक व पथ्यकर शाकाहारी अन्नच ते घेत असत. याचा परिणाम जादूसारखा झाला. समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढू लागली. किती तरी काऊंट सामंत ( टॉलस्टॉय सुद्धा एक सामंतच होते), राजकुमार, उच्चकुलीन धनाढ्य लोक, कॉलेजातील प्राध्यापक हातात फावडी, कुदाळी घेऊन त्यांच्या बरोबर शेतात काम करू लागले. त्या कामात त्यांना आनंद वाटू लागला. रस येऊ लागला. त्यांचे जीवन पूर्णपणे निष्पाप होते. नैसर्गिक वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगत असल्यामुळे त्यांची गणना ऋषी म्हणून होऊ लागली.
मे 2009
अखण्ड ज्योती (मराठी)