प्रत्येक मनुष्याच्या देहाभोवती एक प्रकारचे तेजोवलय विलसत असते. हे त्याचे शारीरिक व आत्मिक तेज होय. चेहऱ्याभोवती हे विशेष प्रखर असते. यालाच आभा मंडळ म्हणतात. देवांच्या चेहऱ्या भोवती, सत्पुरुषांच्या मुखमंडळाभोवती हे आभा मंडळ चित्रांमध्ये पाहायला मिळते. पण कुणा व्यक्तीच्या भोवताल हे आभा मंडळ ‘साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. वास्तविकपणे या आभा मंडळाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यात आणि एकूणच व्यक्तिमत्वा मध्ये विशेष करून दिसून येते. आभा मंडळ ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. महापुरुष सत्पुरुष व प्रतिभावंत यांचे आभा मंडळ प्रखर असते. आभा मंडळांतील चैतन्यकण वातावरणात घोळले जातात आणि आसमंतात आध्यात्मिक तेजाची पखरण ‘ करतात. अशा या दिव्य आध्यात्मिक वातावरणात राहायला मिळाले तर मनाला फार शांती लाभते, हृदयातील भावना उचंबळून येतात. मन गहिवरून येते आणि भावावेश अनावर होतो. अशा वातावरणात राहून मनाला सुख वाटते, शांती वाटते आणि त्या व्यक्तीकडे आपण ओढले जातो. त्याच्याजवळ गेल्यास दिव्य अनुभूती होऊ लागते, मन निर्मळ बनते आणि अंत:करण हेलावून जाते. प्रत्येक व्यक्तीच्या सभोवताल त्याच्या आतल्या चैतन्याच्या मानाने कमी जास्त प्रमाणात आभा मंडळाचे अस्तित्व असते. आभा मंडळाची उपस्थिती विज्ञान देखील सिद्ध करू शकते. प्रयोगशाळेत प्रयोगाद्वारे त्याचे अस्तित्व सिद्ध करता येऊ शकते. आभा मंडळ म्हणजे आपल्या अंतरंगातील ऊर्जेचे, प्राण प्रवाहाचे अदृश्य असे तरंग असतात. व्यक्तीच्या अंगाअंगातून या प्राण प्रवाहाच्या लाटा बाहेर उसळू लागतात. प्रत्येकाच्याच शरीरातून ही ऊर्जेची किरणे बाहेर पडत असतात. कुणाची किरणे कमी, कुणाची जास्त, कुणाची मंद, तर कुणाची तीव्र असते. उघड्या डोळ्यांनी यांना पाहता येत नसले तरी त्या किरणांच्या ऊर्जेची ऊब, प्रखरता अनुभवता येऊ शकते. ही किरणे जेवढी पावन असतील, परिष्कृत असतील तेवढेच त्यांचे तेज आणि घनत्व अधिक असते. हे सारे त्या त्याव्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. अधिक आकर्षक व्यक्तीची ऊर्जा अधिक तीव्र असेल, महापुरुषांचा चेहरा या आभा मंडळामुळेच प्रदीप्त, आकर्षक आणि जीवनशक्तीने भरलेला व संपृक्त असा दिसतो. महापुरुषांचे सूक्ष्म शरीर म्हणजे या चैतन्ययुक्त लहरींचाच सघन आविष्कार असतो. त्यांची आभा अत्यंत आकर्षक, मोहक आणि तेजस्वी असते. या सुन्दर, आकर्षक चेहऱ्या समोर इतर सर्वजण कुरूप दिसू लागतात. त्यांची दृष्टी जणू ईश्वराचे सौंदर्य आपले ठिकाणी समाविष्ट करून घेत असते, परमेश्वराच्या सृष्टीच्या कणाकणात त्यांना परमात्म्याचे सौंदर्य दिसू लागते. त्या परम सौंदर्याचा आविष्कार त्यांच्या दृष्टीला सदैव होत असतो.
ही आभा मंडळाची ऊर्जा प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसली तरी आजच्या विज्ञानाने त्या ऊर्जेचेे छायाचित्र घेण्याची सोय केली आहे. चेहऱ्यातून व डोक्यातून निघणाऱ्या ऊर्जा, लहरींचा फोटो उपग्रह कमेऱ्याने घेता येते असे “इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फोटोजिओ मॉर्फालॉजिस्ट” या संस्थेच्या संशोधकांनी म्हटले आहे. त्यांचे म्हणणे या बाबत स्पष्ट आहे. आपल्या दृष्टीची मर्यादा काही विशिष्ट रंगपट पाहण्यापुरतीच असते. आभा मंडळाच्या विद्युत चुंबकीय लहरींची मर्यादा आपल्या दृष्टिपटाच्या पलीकडली असल्यामुळे आपण ती पाहू शकत नाही. पण आधुनिक कॅमे-याच्या साहाय्याने अल्ट्राव्हायोलेट व इन्फ्रारेड तरंगाच्या बाहेरच्या विद्युत चुंबकीय लहरी पकडता येऊ शकतात. त्या कॅमेऱ्यांनी शरीरातून निघणाऱ्या अदृश्य किरणांचा फोटो घेऊन त्याचे विश्लेषण करणे आता शक्य झाले आहे. ही उपग्रह रेकॉर्डिंग प्रणाली या दृष्टीने फार उपयुक्त आहे. एका घराच्या खोलीत किती माणसे बसलेली आहेत, हे या कॅमैऱ्याच्या मदतीने सांगता येऊ शकते. जर त्या त्या व्यक्तींची एनर्जी स्पेक्ट्रम इमेज आधीच कॉम्प्यूटर मध्ये साठवून ठेवली असेल, तर त्या माणसांची प्रत्यक्ष ओळख देखील या पद्धतीने करता येऊ शकते. अंतरिक्षात आता असे अनेक उपग्रह भ्रमण करीत आहेत. त्यांच्या वर प्रभामंडळाचे चित्र घेऊ शकणारे कॅमेरे लागलेले आहेत. त्यांच्या कॉम्प्यूटर मध्ये काही व्यक्तींची आधीची ओळखीची ऊर्जा तरंगाची माहिती साठवून ठेवलेली असेल तर ती व्यक्ती जगात कुठेही असली तरी तिला शोधून काढता येऊ शकते, तो एखाद्या तळघरात लपला असेल तरी त्याला हुडकून काढता येऊ शकते. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रभामंडळाच्या स्पेक्ट्रमचे डिजिटल स्वरूप आधीच सांकेतिक रूपाने ओळखीसाठी त्याच्या कॉम्प्यूटरमध्ये असायला पाहिजे,
आभा मंडळ ओळखण्याची ही पद्धती जर व्यापक रूपाने प्रसारित करता आली तर त्याचा फार मोठा उपयोग ‘होऊ शकतो. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना ओळखण्यासाठी तसेच बँकेत व एटीएम मध्ये व इतर अशाच महत्त्वाच्या ठिकाणी ही प्रणाली लावून हव्या त्या व्यक्तीची पूर्ण माहिती गोळा करता येऊ शकेल आणि त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीचा ठावठिकाणा सहजपणे लावता येऊ शकेल. इंटरनेटवर आजकाल गूगल नेटवर्क विश्वाच्या पाठीवर कुठलेही चित्र घेऊन दाखवू शकते. एकसष्ठ सेंटिमीटर (2 फूट) आकाराच्या कुठल्याही वस्तूचे स्पष्ट चित्र घेण्याची व्यवस्था करून इंटरनेटने या क्षेत्रातः एक क्रांती केली आहे. अमेरिकेच्या व्यावसायिक उपग्रहाजवळ ही तांत्रिक ज्ञानाची कुपी आहे आणि अगदी सुलभपणे सहजगत्या विश्वाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांतील बातमी लावण्याचे सामर्थ्य त्याच्या द्वारे त्याला लाभले आहे. भारतीय उपग्रहाचे नियंत्रण करणाऱ्या ‘इसरो’ या संस्थेने देखील भारताच्या गावांची, नगरांची त्यातील सडका गल्ल्या, नदी, तळे, विहिरी यांचे छायाचित्र घेण्याची प्रणाली सुरू केली आहे. लहान लहान वस्तूंचे ‘चित्र घेण्याची सोय सध्यातरी फक्त संरक्षण खात्याच्या अधिकार क्षेत्रात मर्यादित आहे. या संपूर्ण चर्चेचा उद्देश व्यक्तीच्या आभा मंडळाचे चित्र घेण्याविषयीची शक्यता आहे हे लक्षात घेण्याकडे आहे, हे वाचकांच्या लक्षात येईलच. या क्षेत्रात अजून बरेच संशोधन व्हायचे आहे. पण , निकटच्या भविष्यात ही गोष्ट विज्ञानाला शक्य होईल हे निश्चितपणे दिसत आहे. विज्ञानाचे म्हणणे आहे की या आभा मंडळाची आपल्या शरीरात काही विशिष्ट केन्द्रे आहेत. या केन्द्रांच्या आजूबाजूला ही ऊर्जा अधिक तीव्र असते. ही केन्द्रे म्हणजे डोळे, चेहरा, जननेन्द्रिय, पायाची व हाताची बोटे तसेच डोक्यावरचे शेंडीचे स्थान ही आहेत. या अंगाच्या ठिकाणी आभा मंडळ अधिक तीव्र दिसून येते. या विषयी बरेच संशोधन व्हायचे आहे. विज्ञान या विषयी संशोधन करीत आहे. पण याविषयीचे ज्ञान आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी गहन संशोधन करून फार पूर्वी प्राप्त केले होते. कुणाला आशीर्वाद देतांना हात पुढे करण्यात येतो. कुणा वडिलधाऱ्या माणसांना नमस्कार करतांना त्यांच्या पायावर डोके ठेवणे यामागे याच अदृश्य ऊर्जा किरणांचा प्रभाव ग्रहण करणे हा उद्देश आहे. आशीर्वाद देतांना देणाऱ्या व्यक्तीच्या अंगातील ऊर्जेच्या लहरी बोटांच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी जाऊ शकतात. आपल्या हातांनी कुणाच्या पायाला स्पर्श केल्याने दोघांच्या मध्ये एक प्रकारचा विद्युत पथ तयार होतो आणि स्पर्श करणाऱ्याच्या हातात ही ऊर्जा प्रवेश करते. याशिवाय आणखी एक परिणाम होतो, वैज्ञानिकांना त्याचे अजून आकलन व्हायचे आहे. पायाला स्पर्श करणाऱ्याच्या अंगचे वाईट संस्कार पायाच्या माध्यमाने ज्यांचे पाय लागायचे आहेे त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. यासाठीच समर्थ महापुरुषांचे व सिद्ध पुरुषांचे पाय लागण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्यांच्या ठिकाणी असलेल्या तपश्चर्येच्या आगीत हे संस्कार जळून भस्म होऊन जातात. पण साधकांना मात्र या प्रक्रियेच्या जवळ जाऊ नये, अशी एक प्रकारची सावधगिरीची सूचना देणे आवश्यक आहे.
डोळ्यात या आभा मंडळाचे तेज सर्वात जास्त असते. कुणाच्या डोळ्यात खोलवर पाहून त्याच्या व्यक्तिमत्त्वा विषयी बरीचशी माहिती सहजगत्या मिळविता येऊ शकते. डोळ्यात डोळे घालून पाहिल्यास देखील या ऊर्जा लहरींचा क्षय होत असतो. साधकांना याचसाठी विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक असते. त्यांना स्त्रियांकडे सरळ सरळ पाहण्याची किंवा त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलण्याची मनाई करण्यात येते, जेणेकरून या प्रक्रियेमुळे त्यांच्या आतली ऊर्जा नष्ट होऊ नये, साधनेच्या वेळी आपल्या डोक्याच्या शेंडीला गाठ मारण्याची प्रथा आहे. यामागे देखील वैज्ञानिक कारण आहे. ऋषी सांगतात की अंतराळातील ऊर्जेची किरणे मनुष्य आपल्या या शिखेच्या द्वारे ग्रहण करीत असतो. या ठिकाणी ही बाहेरची किरणे एकत्रित होतात, आकर्षिली जातात. मंत्राच्या द्वारे शिखेला गाठ मारून घेणे म्हणजे याठिकाणी एक प्रकारचा व्हाल्व्ह बसविण्यासारखे आहे. अंतराळातील ऊर्जा त्या मार्गाने आपल्या शरीरात प्रवेश करू शकते, पण ती परत बाहेर मात्र जाऊ शकत नाही. शेंडी ‘मोकळी असेल तर ती गोळा झालेली ऊर्जा परत जाण्याची शक्यता हमखास असते.
शरीरातील आभा मंडळाचे सर्वात जास्त क्षरण कुठून होत असेल तर ते केन्द्र आहे जननेन्द्रिय ऋषी सांगतात, मैथुन क्रिया केल्यास आपल्या शरीरातील ही विद्युत ऊर्जा पुराचा लोंढा वाहत जावा तशी बाहेर सांडू लागते, म्हणूनच या ठिकाणी फार संयम बाळगण्याची सावधगिरीची ‘सूचना देण्यात येत असते. उच्च पातळीवरच्या या अमूल्य चेतनेचा वायफळ खर्च होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. याचा अधिक क्षय झाला तर त्यामुळे आपले पतन होऊ शकते. याशिवाय तामसिक वृत्तीच्या माणसांशी अधिक संपर्क करू नये. अधिक जवळीक साधू नये. तामसिक आहार-विहारापासून दूर राहावे, मदिरालयात जाऊ नये. कुठे हाणामारी होत असेल, दंगा होत असेल, अशा ठिकाणी जाऊ नये. कारण अशा ठिकाणी वाईट संस्काराची ऊर्जा फार विपुल प्रमाणात असते. तिथले आभा मंडळ मलिन झालेले असते, त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होण्याची शक्यता असते. याउलट मंदिर तीर्थस्थाने, नैसर्गिक ठिकाणे, भजन, पूजन होत असलेले स्थान, स्वाध्याय होत असलेले स्थळ, तसेच संत, महात्मे जिथे राहत असतील, ते स्थान फार उत्तम असते. उच्च पातळीवरील ऊर्जा तिथे घनदाट झालेली असते. आपण तिथे गेल्यास त्याचा लाभ आपणास सहजासहजी मिळू शकतो म्हणून संतांच्या सांनिध्याचे व पवित्र ठिकाणी साधना करण्याचे माहात्म्य सांगण्यात येते.सिद्ध पुरुषांच्या व महापुरुषांच्या भोवतीच्या वातावरणात ही अदृश्य ऊर्जेची किरणे संचित होतात व त्यांचा परिणाम आपल्यावर अगदी सहजगत्या होऊ लागतो. याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो. या सघन ऊर्जेच्या प्रभावामुळे आपली वृत्ती बदलू शकते व वाईट प्रवृत्ती हळूहळू लयाला जाऊ लागते. ऋषीच्या आश्रमात गाय आणि वाघ यांचे शेजारी शेजारी राहणे हे या ऊर्जेचेच परिणाम आहेत. विपरीत वृत्ती असलेली जनावरे इथे येऊन या पवित्र वातावरणात प्रेमाने एकत्र राहू शकतात, हा चमत्कार या ऊर्जेचाच आहे. सिद्धांच्या, संत पुरुषांच्या आभा मंडळाचे हे वैशिष्ट्य आहे. यांच्या जवळ गेल्याबरोबर मन शांत होऊ लागते. हृदय शांत होऊ लागते. अंतरीचे उद्वेग आणणारे भाव शांत होऊ लागतात आणि हृदयात प्रेम दाटू लागते. उल्हास वाटू लागतो. आपल्या या आभा मंडळाचा विस्तार करता येऊ शकतो. विधायक चिंतन ठेवणे, मनात सदैव पवित्र भावना बाळगणे, याद्वारे आभा मंडळाची वृद्धी होते. या वृद्धी बरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाढते. म्हणून आपण नेहमी उकृष्ट चिंतन करावे, सद्भावना बाळगावी, आपल्या जीवनात या वृत्तीचा आविष्कार करावा आणि आपले व्यक्तिमत्त्व उजळवावे, आपले आभा मंडळ अधिक उज्वल बनवावे. एप्रिल 2009 अखंड ज्योती