अबूअली शफिक खुदाची पूजा-आराधना फार करीत असत, पण स्वतःचे पोट मेहनत मजुरी करूनच भरीत. एका संत पुरुषाला अशा प्रकारे मजुरी करतांना पाहून एका श्रीमंत माणसाला त्यांची दया आली व त्याने आपले बरेचसे धन त्याच्या समोर ठेवून म्हणाले – “आजपासून आपण या पैशाने आपला निर्वाह करावा. मजुरी करून स्वतःची उगाच मानहानी करून घेऊ नये.”
अबू अली म्हणाले – “मी आपले धन घेऊ शकत नाही. त्या मागे पाच कारणे आहेत, ती अशी – 1) लोभीवृत्ती माझ्यावर येऊन आपला पगडा बसवेल 2) मेहनत न केल्याने माझे शरीर व मन आळशी बनून ते अनेक प्रकारच्या वाईट वृत्तींनी भरून जाईल. 3) चोर माझ्या घरावर सुद्धा घाला घालतील 4) आपले कर्ज मला कधी न कधी चुकवावेच लागेल 5) आपण केलेल्या या उपकारामुळे मला माझी मान सदा खाली वाकवून जगावे लागेल.
अबू अलीने नंतर आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की अशी आकर्षणे प्रत्येक साधकाच्या आस्थेची व निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी येतच असतात. मी जर त्या क्षणी आपल्या आस्थेपासून पळालो असतो तर मला सुविधा तर मिळाली असती; पण मी माझे संतत्व गमावून बसलो असतो.
जून, 2021 अखंड ज्योती (मराठी)