सृष्टिकर्त्याने एक दिवस विचार केला की पृथ्वीवर जाऊन आपण बनविलेल्या सृष्टीला एकदा तर बघून यावे. पृथ्वीवर पोहोचताच सर्वात आधी त्यांची दृष्टी एका शेतकऱ्यावर पडली. तो हातात कुदळ घेऊन डोंगर खणण्याचे काम करीत होता. त्याला एवढे मोठे काम करतांना पाहून सृष्टिकर्त्याला हसू आले व आश्चर्यही वाटले. ते शेतकऱ्या जवळ गेले व यामागील कारण विचारू लागले. तेव्हा उत्तर मिळाले – “महाराज! माझ्यावर बघा हा किती मोठा अन्याय होतो आहे या पर्वताला दुसरीकडे कुठेच जागा मिळाली नाही की काय ? ढग येतात व ते या डोंगराच्या पलीकडे आपली धडक मारून तिथेच पाऊस पाडतात. पर्वताच्या अलीकडे असलेले माझे शेत नेहमी. कोरडेच राहते.” “पण तू एकटा या एवढ्या मोठ्या पर्वताला हटवू शकशील का?” ” सृष्टीकर्त्याने आश्चर्याने त्याला विचारले. तेव्हा शेतकरी म्हणाला, “हो! हो! का नाही ? मी याला येथून हटविल्याशिवाय राहणार नाही. माझा हा दृढ संकल्प आहे.” सृष्टिकर्ते पुढे निघून गेले, तेव्हा त्यांच्यासमोर डोंगर याचना करू लागला. तो हात जोडून अजीजीच्या स्वरात म्हणाला- “हे विधाता! या जगात आता आपणाशिवाय माझे रक्षण कोणीच करू शकत नाही.” स्रष्टा त्याला म्हणाले – “एका लहानशा शेतक-याच्या बोलण्यावरून तू एवढा का घाबरला आहेस?” तेव्हा पर्वत म्हणाला – “देवा! आपण त्याची निष्ठा बघितली नाही का ? माझा स्वतःचा अनुभव असा आहे की निष्ठावान माणसाचे संकल्प कधीच अपुरे राहत नाहीत. एवढी प्रचंड आस्था जर अशीच पिढ्यान पिढ्या त्याच्या कुटुंबात चालत राहिली तर संकल्प पूर्ण होईस्तो ते विराम घेणार नाहीत.” सृष्टिकर्त्याने त्या शेतकऱ्याच्या संकल्पाची स्तुती केली आणि स्वतःच्या या कृतीवर त्यांना गौरवाची अनुभूती होऊ लागली.
जून, 2021 अखंड ज्योती (मराठी)