सर्वसामान्य मनुष्य वर्तमान काळात जगत असतो. उद्याची चिंता न करता आज जास्तीत जास्त आनंद कसा मिळविता येईल, याचा विचार तो करीत असतो. परंतु बुध्दिवान मनुष्य मात्र आपले भविष्य कसे सुधारता येईल, याचा विचार करून वर्तमान काळाचा चांगला उपयोग ‘करून घेत असतो. भविष्य सुधारण्यासाठी अनेकदा वर्तमान काळात मोठमोठ्या अडचणींचा सामनासुध्दा करावा लागतो. सर्वसामान्य मनुष्य आणि बुध्दिवान मनुष्यामध्ये हाच फरक असतो. सर्वसामान्य मनुष्य हा आजच्या भोगविलासामध्ये आकंठ बुडालेला असतो आणि हे सुख कधीच संपू नये, असे त्याला वाटत असते. परन्तु या जगात कोणते ही सुख स्थायी नसते.
सुखानंतर दुःख आल्यावर मनुष्य फार दुःखी होतो. आपल्या दुःखांकरिता तो इतरांना दोष देतो. सुख आणि दुःख एकानंतर एक येत असतात. कुणीही नेहमी करिता सुखी राहत नाही, तसा तो दुःखी सुध्दा राहत नाही. बुध्दिवान मनुष्य सुख आणि दुःखाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो व सुख-दु:खांमध्ये सन्तुलन स्थापित करण्याचा प्रयत्न करतो.
बुध्दिवान मनुष्याला माहिती असते की जे डोळ्याने दिसत आहे तेच खरे नाही. मनुष्य जीवनामध्ये कर्माचा सिध्दांत मुख्य रूपाने लागू होत असतो. वर्तमान क्षण लवकरच संपून जाणारे असतात. म्हणून त्याचा उपयोग विवेकपूर्ण रीतिने केला पाहिजे, जेणेकरून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. बुध्दिवान मनुष्याच्या योजना त्याच्या सामर्थ्यानुसार व शक्तिनुसार असतात. तो वर्तमान काळाचा भरपूर सदुपयोग करीत असतो. पुढे
जाऊन सफलता मिळेल की असफलता मिळेल याची चिंता तो करीत नाही. तो दुःखात दुःखी होत नाही व सुखात अहंकारी होत नाही.
संघर्ष आणि अडचणींना घाबरणाऱ्या लोकांना संतोषजनक उपलब्धी मिळत नाही. सर्वसामान्य मनुष्य हा वर्तमान काळाला सर्व काही मानून समाधान करीत असतो. त्यामुळे पुढे येणाऱ्या आडचणींच्यावेळी तो घाबरून जात असतो. बुध्दिवान मनुष्य मात्र प्रत्येक क्षणाला संघर्ष करीत असतो. सर्वसामान्य मनुष्यापढे कोणतेच ध्येय नसते परन्तु बुध्दिवान मनुष्य मात्र आपल्या समोर कोणते तरी ध्येय ठेवूनच पुढे पुढे चालत जातो.
आपण स्वतःमध्ये संघर्ष करण्याची मानसिकता तयार ठेवली पाहिजे. संघर्ष करतांना येणारा मृत्यू हा माणसाला येणाऱ्या हजार सर्वसामान्य मृत्यूपेक्षा श्रेष्ठ असतो. चांगल्या उद्देश्याकरिता येणारा मृत्यू हा सर्वश्रेष्ठ मृत्यू असतो. म्हणून विचारवन्तानो , या देशाच्या कर्णधारांनो, तरुणांनो, आपणा सर्वांना भावुकतापूर्ण आमंत्रण दिले जात आहे. आज मानवतेवर संकट आलेले आहे. अशा वेळी स्वार्थ व संकीर्णता सोडून काही वेगळे करून दाखविण्याची आवश्यकता आहे. आपले सुख दुःख बाजूला ठेवून मानवतेच्या संरक्षणात पुढे येणाऱ्या महासंघर्षाकरिता तयार रहा. आपणा सर्वांना आणखी एक महासंग्राम जिंकायचा आहे, हा महासंग्राम मानवतेला वाचविण्यासाठी आहे. मानवताच जर राहणार नाही तर आपण जगायचेच कशाकरिता ? म्हणून हे आवाहन आपण स्वीकारलेच पाहिजे. हाच युगधर्म आहे व याचेच पालन करावयाचे आहे. हीच खरी बुध्दिमत्ता होय.
मे 2008
अखण्ड ज्योती (मराठी)