Home देवाशी माणसाची नेहमीसाठीच गाठ आहे

देवाशी माणसाची नेहमीसाठीच गाठ आहे

by

Loading

हे विश्व संगीतमय आहे. याची उत्पत्ती शब्दांपासून झाली आहे. सृष्टीच्या विशाल पसाऱ्यात विश्व संगीताच्या नादात सूर्य, चंद्र, तारे, जीव, प्राणी, वनस्पती सदैव आपापला विशिष्ट सूर नादवीत असतात. वीणेची तार कधी पंचमात तर कधी मध्यमात बांधली जाते व त्याप्रमाणे त्यातून वेगवेगळे वादी संवादी स्वर निघत असतात आपल्या स्वरानुसार आपणाला ईश्वराशी विशेष संबंध बांधून ठेवला पाहिजे व त्या संबंधाचा एक संवादी स्वर लावून ठेवला पाहिजे जेणेकरून आपले हे मानवी जीवन संगीतमय होईल, प्रवाहयुक्त होईल.

ज्याच्या वीणेची तार अजून या सप्तकातील स्वरात बांधलेली नाही त्याचे जीवन अपूर्ण आहे, ज्याच्या जीवनाची मूळ तार बिघडलेली आहे तुटून गेली आहे, ती तार पुन्हा नव्याने बांधायला हवी. तिला पुन्हा स्वरात लावायला हवी. एक स्वर ध्रुव मानून त्याच सप्तकात त्यातून आपला मिळता जुळता सूर काढता यायला हवा, तरच मानवाचे कल्याण होऊ शकेल.

ही तार बांधायची कशी ? देवाच्या वाणीशी तिला बांधून घेण्याच्या अनेक जागा आहेत. अनेक तऱ्हा आहेत. यापैकी कुठली तरी एक जागा निश्चित करून घ्यायला हवी.

मंत्र याच प्रकारचे बंधन आहे. मंत्राद्वारे मनाच्या विषयाला समष्टी मनाशी जोडून घ्यावे लागते. वीणेच्या खुंटीशी तार बांधून घेतात. ती मग सुटत नाही. ईश्वराशी मानवाची जी गाठ बांधली जाते त्यासाठी मंत्रच मदत करीत असतात. असाच एक मंत्र आहे- “पिता नोऽसि. ” आपले जीवन या सुरात बांधून घेण्यासाठी आपण प्रयत्न केला तर आपल्या विचारातून व कार्यातून एक विशिष्ट रागिणी वाजू लागते. “मी त्याचा पुत्र आहे. ” हा मंत्र संगीत बनून प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूपात प्रगट होऊन शरीराच्या प्रत्येक तारेमधून तो झंकार करू लागतो.

– पं. श्रीराम शर्मा आचार्य

सप्टेंबर 2009