एक स्त्री आपल्या माहेरी जाऊन नुकतीच परत आली होती. ती आपल्या पतीला सांगू लागली “माझा भाऊ तर आता विरक्त झाला आहे. त्याला या जगाचा वीट आला आहे. येत्या दिवाळीला तो दीक्षा घेणार आहे. मग तो साधू बनेल. त्याने तर आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. आपल्या संपत्तीची योग्य ती सोय करण्यात व त्याची विल्हेवाट लावण्यात तो गुंतला आहे. ” पत्नीचे हे बोलणे ऐकून पती हसू लागला. पत्नी विचारू लागली – ” हसायला काय झाले ? यात हसण्यासारखे काय आहे ?” पती म्हणाला, “बाकी तर सर्व काही ठीक आहे. पण तुझ्या या भावाचे हे वैराग्य मला जरा विचित्रच वाटते. दीक्षा घेण्याची तिथी ठरलेली आहे. संपत्तीची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करू लागला आहे, हे काही पटत नाही. त्याग असा नसतो. त्याग तर सहज होऊन जायला पाहिजे. “पत्नीला हे ऐकून वाईट वाटले. ती तोऱ्याने बोलू लागली, “एवढे ज्ञानवंत आहात, एवढा वाद घालता आहात, तर मग स्वतःच का नाही वैराग्य घेऊन दाखवीत तुम्ही ?” पती म्हणाला, “मी तर तुझ्या या सहमतीचीच वाट पाहत होतो. ” एवढे बोलून त्याने आपले सगळे कपडे काढून ठेवले. अंगावर फक्त एका धोतराशिवाय काही राहू दिले नाही आणि तडक तो घर सोडून बाहेर पडला. पत्नीला ही थट्टा वाटली. तिने विचार केला, येतील झाले, थोड्या वेळात. जातात कुठे ? पण तो तर परत येण्यासाठी गेला नव्हता. तो गेला तो वैराग्य घेऊनच घराबाहेर पडला होता.
खरे पाहता वैराग्य, जीवनदान, समयदान यासाठी कुठल्या ही मुहूर्ताची वाट बघत राहण्याची गरजच नसते. ती गोष्ट तर सहज होत असते. मनात आले आणि केले, एवढ्या सहज होऊन जाते.
अखण्ड ज्योती (मराठी)
नोंव्हेबर 2010