मानवी जीवनाचा एक अभिन्न व आवश्यक अंग म्हणजे दुस-यांशी योग्य वर्तणुक करणे होय. आपल्या पुढे जशा परिस्थिती येतात, त्यानुरूपच आपण दुसऱ्यांशी वर्तणूक करीत असतो. कोणत्याही व्यक्तीच्या वागणुकीकडे बघून त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज सहजपणे घेतल्या जाऊ शकतो. आपल्या वागण्यातून मनुष्य केवळ आपल्या भावभावनांनाच व्यक्त करीत नाही, तर तो स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला सुद्धा प्रदर्शित करित असतो. म्हणूनच कोणाचेही वागणे, व्यवहार बघून, त्याला समजून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाजसुद्धा बांधल्या जाऊ शकतो. याकरिताच आपल्याला परिस्थितीनुसार योग्य प्रकारे व्यवहार करण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे. असे झाले तरच आपण व्यवहार कुशल बनू व आपल्या व्यावहारिक जीवनाप्रती आपल्या कर्तव्याचा निर्वाह चांगल्या प्रकारे करू शकू. व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात समजूतदारपणा व नम्रतेची फार आवश्यकता असते. समजूतदारपणा असल्याशिवाय आपण आपल्या वागणुकीला योग्य प्रकारे अभिव्यक्त करू शकत नाही, तसेच नम्रतेच्या अभावी आपल्या वागणुकीमधील सौंदर्यसुद्धा वर येऊ शकत नाही. चांगल्या व्यवहाराद्वारे व्यक्ती कुणालाही क्षणभरात प्रभावित करू शकतो व अनोळखी लोकांना सुद्धा आपले सहयोगी बनवू शकतो. व्यवहार कौशल्यामध्ये असे सामर्थ्य आहे की ज्याद्वारे मनुष्य अनेक लोकांसोबत प्रेमपूर्वक राहू शकतो, जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो; पण याउलट जर तो गुण त्यात नसेल तर त्याच्या कौटुंबिक सदस्यांमध्ये सुद्धा ताळमेळ बसविणे व सामंजस्य स्थापित करणे त्यास कठीण होऊन जाते.
आपण जे काही कार्य करतो, त्यातून आपल्या वागणूकीचा आभास सर्वांनाच होत असतो; म्हणूनच आपाल्याला कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारचा व्यवहार करावा, याची समज असणे फार आवश्यक आहे. आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारायला हवा की आपल्या वागण्या-बोलण्यात समजूतदारपणा व कर्तव्यशिलतेचा अभाव तर नाही ना? केवळ दुसऱ्यांना दाखविण्यासाठी केलेला व्यवहार अथवा सौजन्य स्वतःच्या उपयोगितेला गमावून बसत असतात व त्याद्वारे कुणाला काही लाभसुद्धा मिळत नसतो. पण जे लोक आपल्या वागणुकीसोबत समजूतदारपणाची सांगड घालतात, कर्तव्यशिलतेचा पूट त्यासोबत जोडतात, तेव्हा त्यांच्या जोडीने केलेला व्यवहार हा केवळ स्वतःच्या उपयोगितेलाच सिद्ध करीत नाही, तर त्या व्यवहाराच्या उद्देशाला सुद्धा पूर्ण करीत असतो.
एक व्यक्ती आपल्या प्रेरणादायी व प्रभावी भाषणांसाठी फार प्रसिद्ध होती. मोठमोठ्या सेमिनार मध्ये अधिकारी स्तरांच्या लोकांमध्ये त्या व्यक्तीच्या उद्बोधनाची मागणी असायची. एके दिवशी त्याला असे वाटले की आपले हे महत्त्वपूर्ण विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा जायला हवेत. हाच विचार करून तो एका गावात गेला व तिथे आपल्या उद्बोधनाची संपूर्ण व्यवस्था त्याने नीटपणे लावली. संपूर्ण व्यवस्था झाल्यानंतर त्याने तेथील लोकांना सात दिवसाच्या या भरगच्च उद्बोधनाच्या कार्यक्रमाला येण्यासाठी निमंत्रण दिले.कार्यक्रमाची सुरुवात झाली व सहा दिवसापर्यंत तो कार्यक्रम फार उत्तम रीतीने चालला. त्यावेळी थंडीचे दिवस होते. एके दिवशी थंडी फार वाढली व हवामानसुद्धा बिघडले. वक्त्याला वाटले की आज कोणी श्रोता येणार नाही. हाच विचार करून त्याने काहीच तयारी केली नाही. तेवढ्यात एक शेतकरी तेथे येतांना त्याने बघितले. तो नियमितपणे त्यांचे उद्बोधन ऐकायला येत असे. त्या शेतकन्याला बघून वक्त्याला फार आश्चर्य वाटले व तो म्हणाला ” आज बरीच थंडी वाटते आहे. मला तर आज कोणी श्रोते येतील असे वाटतच नव्हते. म्हणून मीसुद्धा भाषणाची काहीच तयारी केली नाही. आता सांगा, फक्त एका माणसासाठी एवढी सर्व तयारी करणे योग्य होईल का ? आज आपण असे करू या की उद्बोधन न करता आपापल्या घरी जाऊन आराम करू. हेच बरे होईल. “”
शेतकरी म्हणाला “साहेब! मी एक सामान्य शेतकरी आहे. मी रोज कबुतरांना दाणे टाकण्यासाठी जात असतो. कधी एक जरी कबुतर असले तरी मी त्याला दाणे टाकायला विसरत नाही. त्याला दाणे टाकायला नक्कीच जातो. ” शेतकऱ्याचे बोल ऐकून तो गृहस्थ खजील झाला. त्याने त्याची क्षमा मागितली व लगेच उद्बोधानाच्या तयारीला लागला. त्याने सर्व टेबल खुर्च्या स्वच्छ केल्या. प्रत्येक टेबलावर आवश्यक ते सामान ठेवले. खोलीत पंखे लावले, दिवे पेटविले व भाषण सुरू झाले. तीन-चार तासांनी त्यांचे उद्बोधन संपले. शेतकऱ्याने त्याला आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली म्हणून त्याने शेतकऱ्याचे आभार मानले. त्यावर तो शेतकरी काहीच बोलला नाही. तो उठून जाऊ लागला, तेव्हा त्याने शेतकऱ्याला विचारले “काय झाले ? आज माझ्या भाषणात काही कमी राहिली काय ?” शेतकरी म्हणाला साहेब! मी काय सांगणार? मी तर एक सामान्य शेतकरी आहे, पण जेव्हा मी कबुतरांना दाणे टाकण्यास जातो, त्यावेळी एक जरी कबुतर असले तरी मी सर्वच्या सर्व दाणे त्या एकट्या कबुतराला टाकत नाही.” आता त्या गृहस्थाला याची जाणीव झाली की फक्त आपले कर्तव्य निभविणेच गरजेचे नसते, तर परिस्थिती पाहून स्वतःला घडवणे सुद्धा आवश्यक आहे व त्यानुरूप तयारीसुद्धा करायला हवी. केवळ एका माणसासाठी चार तास उद्बोधन देण्याची येथे आवश्यकताच नव्हती.
परिस्थितीनुरूप व्यवहार करण्याची समज असणे म्हणजेच व्यवहार कौशल्य होय. ही समज जर पुरेशी नसेल तर आपण समजूतदार असूनही मूर्खपणाची कामे करीत असतो. समजूतदार बनण्यासाठी आपण आपल्या लहान-लहान चुकांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकावे, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावा व आपल्या वागणुकीत नित्य नवीनता आणावी. आपला व्यवहार असा असावा की ज्यामुळे दुसऱ्यांची मने प्रसन्न होतील व त्यांना समाधान लाभेल. आपल्या वागणुकीने जर लोकांना असंतुष्टी मिळत असेल, त्यांच्या मनाला पीडा होत असेल, लोकांना आपली वागणूक सलत असेल तर अशा वागणुकीत बदल घडवून आणणे व त्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या उत्तम व्यवहाराद्वारे आपण अनेक प्रकारच्या समस्या सहजपणे तर सोडवू शकतोच शिवाय समस्येला आणखी जास्त कठीण व गुंतागुंतीचे होण्यापासून सुद्धा वाचवू शकतो. यालाच स्पष्ट करणारी मेवाड प्रांतातील एक ऐतिहासिक गोष्ट आहे. त्या वेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते व महाराणा फतेहसिंग हे मेवाडचे राजे होते. ते पावसाळ्याचे दिवस होते. त्या वर्षी मेवाडमध्ये नेहमीपेक्षा फार जास्त पाऊस पडला व त्या पावसात फतेहसागर सरोवराचा एक भाग तुटून जाऊन तो पाण्याच्या लोंढ्याने वाहत गेला व त्या प्रवाहात रेल्वेचा एक पूल कोसळला. रेल्वेचे रूळ पाण्याच्या ओघाने वाहून गेले. हे प्रकरण पुढे कोर्टात गेले. इंग्रजी राज्याच्या न्यायालयाने निर्णय दिला की सरोवराच्या पाण्याने जे नुकसान झाले त्याची भरपाई महाराणाने करावी. न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत महाराणांकडे पाठविण्यात आली व त्यांनी तो अहवाल लक्षपूर्वक वाचला. अहवाल वाचल्यानंतर महाराणांनी त्यावर आपली टिप्पणी लिहून इंग्रज सरकारला पाठवली. त्यात त्यांनी लिहिले होते – ” न्यायालयाचा निर्णय मला मान्य आहे. नुकसान भरपाई करण्यासाठी मी तयार आहे; पण माझी यावर एक हरकत आहे. ती अशी की हे सरोवर आधीपासूनच होते व रेल्वेचा पूल हा नंतर बनविण्यात आला. रेल्वे लाईनसुद्धा नंतर टाकण्यात आली. नंतरचे बांधकाम करतांना सरोवराचा विचार व्हायला हवा होता. त्यांच्या या विशेष टिपणीमुळे न्यायालयाला आपला निर्णय बदलणे भाग पडले. शेवटी त्यांनी नुकसानभरपाई व दंड वगैरे सर्वकाही माफ केले.या प्रसंगावरून हे स्पष्ट होते की मनुष्याने जर येणाऱ्या परिस्थितीबाबत समजूतदारपणाने विचार केला, शांतपणे आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून आपली कामे केलीत, तर तो समस्यांचे समाधान तर सहजपणे करू शकतोच शिवाय समस्यांना आणखी गंभीर व भयंकर होण्यापासून सुद्धा वाचवू शकतो. या परिस्थितीत जर महाराणा नुकसान भरपाई देणार नाही म्हणून अडून बसले असते व सरकारशी लढण्यास तयार झाले असते तर कदाचित या समस्येचे शांतीपूर्ण समाधान निघू शकले नसते.
येणाऱ्या परिस्थितीत आपण कसा व्यवहार करावा, याचा निर्णय आपाल्याला स्वतःच घ्यावा लागतो. आपण घेतलेला निर्णय व आपण केलेली वागणूक यामुळे समस्या सुटू सुद्धा शकतात किंवा गुंतागुंतीच्या देखील होऊ शकतात. कधी कधी हट्टपणा व अहंकाराच्या प्रभावात केलेल्या व्यवहाराने छोटीशी गोष्टदेखील मोठी होऊ शकते. त्यामुळे राईचा पर्वत होऊ शकतो. म्हणूनच ज्या व्यवहारात नम्रता असेल,समजूतदारपणा असेल व शुभ भावनेने ती प्रेरित असेल,तीच वागणूक माणसाला शोभनीय असते. जून 2021 अखंड ज्योती (मराठी)