आपल्या भारत देशाची विकास मार्गावरील कथा फार प्राचीन आहे व ती समृद्धशाली आहे. या समृद्धीच्या मागे व संपन्नतेच्या मागे त्याग व बलिदानाची एक मोठी थोर परंपरा आहे. या दीर्घ, प्रचंड व कठीण परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी सध्याची परिस्थिती मात्र दुबळी वाटत आहे. तरीपण ती पूर्णपणे शिथिल झाली किंवा नष्ट झाली असेही म्हणता येणार नाही. त्यामागची जी प्रेरणा आहे ती अजून जिवंत आहे व तीच आपणाला पुन्हा नव्याने समग्र विकासाच्या दिशेने जाण्यासाठी शक्ती देऊ शकते. मधल्या काळात राष्ट्राची परिस्थिती फार वाईट झाली होती. आपल्या राष्ट्राचे संरक्षण करण्याची उमेद आपण घालवली होती, हताश मनःस्थिती उत्पन्न झाली होती आणि त्यामुळे आपण राष्ट्राला वाचवू शकलो नाही. परकीय आक्रमणकाऱ्यांच्या हातात या राष्ट्राचे सुकाणू जाऊन त्यांच्या जुलमाखाली आपल्याला गुलामीत दिवस काढावे लागले होते. आपल्या ठायी घनघोर अंधकार व मूढता, जडता यांचा घोळ वाढला होता. पण त्या ठिकाणी नवे प्राण फुंकण्यासाठी, झोपलेल्या ‘स्वत्वाला जागे करण्यासाठी ही भयंकर आपत्ती आपल्यावर कोसळणे ही म्हणजे एका परीने इष्टापत्तीच म्हणायला पाहिजे. याचा पडताळा १८५७ च्या क्रांतीत पहायला मिळाला. झोपलेल्या सिंहाची गर्जना पुन्हा ऐकायला आली आणि त्यानंतर स्वातंत्र्य युद्धाचे वादळ जे सुटले त्याच्या प्रचंड धुमश्चक्रीत शेवटी १९४७ ला भारताला पारतंत्र्यापासून मुक्ती मिळाली आणि आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या वातावरणात श्वास घेऊ लागलो. पण आपल्या मोठ्या प्रयासाने . मिळविलेल्या या स्वातंत्र्याला नवा धोका उत्पन्न झाला आहे. आपले स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आले आहे. हा धोका बाहेरच्या आक्रमकांपासून नाही, हा आपल्या आतल्याच शत्रूपासून आहे.
भारताच्या विकासाची व समृद्धीची गाथा म्हणजे मुळात त्याच्या आंतरिक उत्कर्षाची, त्याच्या उच्च विचारांची, त्याच्या कर्माच्या मुळाशी असलेल्या विराट, व्यापक व उच्च अशा संकल्पाची व आंतरिक शक्तीची कहाणी आहे. आज आपण आपला विकास हा फक्त आर्थिक दृष्टीवरच आधारलेला विकास एवढ्यावरच मर्यादित म्हणून मान्य करून घेतला आहे. आर्थिक समृद्धी व संपन्नता हीच सर्वात मोठी राष्ट्राच्या उन्नतीची धारणा बनून राहिली आहे. हा आपला नव्हे तर पाश्चात्त्य विचारपद्धतीचा सिद्धान्त आहे. आपण आपले स्वातंत्र्य या जडतेच्या आधारावर मिळवून काही उपयोग नाही. आपण या प्रकारच्या उच्छृंखल अपरिपक्व, अनैतिक व अंधानुकरणाच्या आचरणाने, व्यवहाराने विजयी होऊ शकत नाही किंवा आपला खरा व समग्र विकास करू शकत नाही. असा हा व्यवहार आपणांस आतून पोखरून टाकतो व आपली उंची कमी करून टाकणारा असतो,
महर्षी अरविंदांचे ठाम मत होते की भारताची आध्यात्मिक अस्मिता, त्याची साधना, तपश्चर्या, कर्म, भक्ती शक्ती यामुळे भारत स्वतंत्र होईल आणि तो महान देश म्हणून प्रतिष्ठा मिळवील, आध्यात्मिकता म्हणजे स्वतःच्या विषयीचे, स्वतःच्या आंतरिक शक्तीचे ज्ञान. त्या ज्ञानामुळे आम्ही कोण आहोत, आम्ही कां आहोत, आमचे लक्ष्य काय आहे, आमचा उद्देश्य काय आहे याचा आम्हाला बोध होऊ शकतो. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत आपली आपल्या देशाबाबत काय व कितपत जबाबदारी आहे. हे कसे ओळखणार? स्वतःची नीट ओळख झाल्यावरच आपले सामर्थ्य आपली शक्ती काय आहे हे नीट आजमावून घेतल्यानंतरच आपण कुठल्याही कार्यात यश मिळवू शकतो, सफल होऊ शकतो आणि राष्ट्र व आपल्या मध्ये काय आंतरिक संबंध आहे याची पारख करून घेऊ शकतो. म्हणून राष्ट्राला पूर्णपणे समग्र रूपाने विकसित करण्यासाठी बौद्धिक किंवा आर्थिक आंदोलनाची नव्हे, तर आध्यात्मिक दोलनाची गरज आहे.
मागल्या शतकातल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या असफलतेमागे त्या विषयी केवळ बौद्धिक भूमिकाच मुख्य होती, हेच मुख्य कारण आहे. कुठल्याही परिस्थितीचा पूर्ण आडाखा घेण्यासाठी त्याला नीट समजून घेण्यासाठी केवळ बुद्धी समर्थ होऊ शकत नाही. त्यामागे ज्ञानाने उजळलेल्या हृदयाची आवश्यकता असते. बुद्धी ही एककल्ली असते. ती प्रत्येक बाबतीत आपल्या विशिष्ट पद्धतीने विचार करू शकते, समजण्याचा प्रयत्न करीत असते. तिच्या आवाक्याला देखील एक मर्यादा असते. याच्या जोडीला हृदयातील अत्यंत गूढ, खोल व गाढ भावनांची संगती असेल, तर त्या त्या परिस्थितीचे नीट आकलन करणे व त्या वेळच्या समस्यांचे खरे व संपूर्ण निदान करणे शक्य होत असते. १९१० पासून भारताचे स्वातंत्र्य आंदोलन वेगाने उसळी मारू लागले होते. त्यात मुख्यत्वेकरून राष्ट्रीयतेची भावना ओतप्रोत झालेली होती. मुख्य करून राष्ट्रीयतावाद यांचे प्राबल्य होते.
या राष्ट्रीयतावादाच्या पार्श्वभूमीवर हृदयातील उदात्त प्रेरणा या फार वेगाने व तळमळीने तसेच मोठ्या कौशल्याने विवेक, बुद्धी यांच्या कार्यकुशलतेशी व कार्याशी चांगले सामंजस्य व चांगला संयोग स्थापित करून घेण्यासाठी प्रयत्न करीत होत्या, तरी पण या कार्यात पूर्ण यश मात्र येऊ शकले नाही. याचे कारण देखील एकच होते. भावना, ‘संवेदना, आकांक्षा या सर्व काही भारतीय संस्कृतीच्या अंतःप्रवाहाशी, त्याच्या सतत वाहणाऱ्या भावप्रवाहाशी जुळलेल्या होत्या, पण प्रत्यक्ष कार्य आणि व्यवहार मात्र पाश्चात्त्य विचार प्रवाहापासून वेगळे करणे शक्य झाले नाही. त्या वेळच्या एकूण परिस्थितीची गुंतागुंत नीट समजून घेऊन त्याचे खरे आकलन करून तसेच आपल्या दुर्बळतेची व आपल्या समस्यांची ओळख करून खोलवर विचार करून अंतर्दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीचे साहाय्य घेण्यात आले. पण त्यावेळी पुरेशी प्रज्ञा मात्र कोणी आश्रयाला घेतली नाही. या प्रज्ञेच्या अभावामुळे आजच्या कार्याचे भविष्यकाळात काय परिणाम होतील याचे नीटसे आकलन करणे कोणालाच शक्य झाले नाही.
राष्ट्रीयतावादाने फार भव्य कल्पना करण्यावर भर दिला. राष्ट्राच्या स्वातंत्र्याविषयी अनेक व्यापक कल्पना करण्यात आल्या. कित्येक आदर्शाचा अंगीकार करण्यात आला व त्यापासून हवा तेवढा लाभ मिळविण्यात आला. सामान्य जनतेचे समर्थन सुद्धा मिळाले. संपूर्ण राष्ट्र एका ध्वजाखाली संघटित झाले आणि असे वाटू लागले की आता या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्याचा पायाच खिळखिळा होऊन जाईल, एवढेच नव्हे तर त्याला आपल्या संपूर्ण कार्यक्रमांसहित व्यापार विनिमयासहित भारताच्या राजकारणाला सोडून दूर निघून जाणे भाग पडेल, एवढे सर्व झाले तरी त्या वेळच्या नेतृत्वाला याच्या मुळाशी असलेल्या गूढ सत्याकडे पाहणे व ईश्वराची इच्छा समजून घेणे शक्य झाले नाही. या आंदोलनात जनतेचा उत्साह व भावनांचा आवेग काही कमी नव्हता. शेकडो वर्षापासून राष्ट्र अगदी निपचित पडून राहिले होते, झोपलेले होते, त्याची सक्रियता लोपली होती, ते अचानक खडबडून जागे झाले होते. तरीपण या आंदोलनात इच्छाशक्ती व पवित्र शक्ती, उदात्त बळ यांचा मात्र अभाव होता. केवळ आवेग, उत्साह, यापेक्षा त्यांची अधिक थोरवी असते. ही शक्ती व बल मोठे व तीव्र असायला हवे होते. पण दुर्दैवाने त्यांचीच वाण होती.
या राष्ट्रीयतावादाला स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही पातळीवर बळ मिळाले होते. स्थूल रूपाने महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, गोखले, नेहरू, चाफेकर बंधू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला यांच्या सारख्या महान देशभक्त्यांचे व हुतात्म्यांचे थोर योगदान लाभले होते. सूक्ष्मरूपाने श्री अरविंद, रमण महर्षी, स्वामी विवेकानंद व हिमालयात राहणाऱ्या दिव्य आत्म्यांची महत्त्वाची भूमिका होती. श्री अरविंद हे तर स्वातंत्र्य चळवळीचे खरे महानायक होते. प्रत्यक्षात मात्र याचे स्थूल रूपात श्रेय भगवंतांनी महात्मा गांधी यांना दिले. या दोन्ही पातळ्यांवर स्वातंत्र्य चळवळीला जे बाह्य व आंतरिक बळ लाभले, त्यामुळे भारताचा विजय निश्चितपणे होऊ शकला. कुठल्याही परिस्थितीत पराजय होऊ शकणार नाही, शेवटी विजय हा मिळणारच ही नियती निश्चित ठरून गेली होती. आणि शेवटी ते घडून आले. पराजयाच्या पारतंत्र्याच्या शेकडो वर्षांच्या बेड्या तोडून भारत स्वतंत्र झाला. यापुढे हा विजयाचा रथ पुढे हाकण्यासाठी बदललेल्या परिस्थितीचे सटीक आकलन करण्याची फार मोठी आवश्यकता होती. पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याच्या या प्रज्वलित झालेल्या ज्वालांनी भडकलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या निःस्वार्थीपणाची तपश्चर्येची, ज्ञानाची पूर्णता ज्याच्या जवळ असेल अशा आत्म्याची, अशा व्यक्तिमत्त्वाची पूर्णपणे उणीव दिसून आली.
..हाच अभाव देशाला नडला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाला समग्र विकास करण्याच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याकरिता जो सघन, दुर्दम्य संघर्ष करावा लागला तो आजपर्यंत तसाच चालला आहे. याचे निदान, जोपर्यंत ‘बुद्धीच्या जोडीला हृदयाची भाषा ऐकण्यासाठी आपण तत्पर होणार नाही तोपर्यंत होऊ शकणार नाही. अंतर्ज्ञान मिळविल्याशिवाय समग्र प्रगती होणे शक्य नाही. हे केवळ आध्यात्मिक आंदोलनाद्वारेच सफल होऊ शकेल. याचसाठी त्या आंदोलनाला विचार क्रांतीच्या रूपाने बळ आणि पोषण देण्यात येत आहे. या क्रांतीचे प्रणेते राष्ट्राच्या या स्थितीविषयी पूर्णपणे जाणून होते. परिस्थितीचे त्यांना संपूर्ण व खरे ज्ञान होते. म्हणूनच त्यांनी त्याच वेळी, स्वातंत्र्य आंदोलन सुरू असतांनाच लहान पातळीवर का होईना, पण विचार क्रांतीच्या रूपात आध्यात्मिक आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याचे आज हे व्यापक व विराट स्वरूप दिसून येत आहे. भविष्यातल्या विश्वाची परिकल्पना याच माध्यमाद्वारे सार्थक होण्याची पूर्ण संभावना व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. श्री अरविंद म्हणतात की “दक्षिणेश्वर येथे जे कार्य सुरू करण्यात आले होते, ते पूर्ण होण्यासाठी अजून बरीच वाटचाल करायची आहे. त्या कार्याला तर कुणी समजू शकले नाही. स्वामी विवेकानंदांनी जे काही मिळविले व ज्याला वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याला अजून देखील पूर्ण मूर्त स्वरूप लाभू शकलेले नाही. विजयकृष्ण गोस्वामी यांनी भविष्याच्या ज्या स्थितीला आपल्या अंतरात लपवून ठेवले होते, ते अजूनही त्यांच्या शिष्यांसमोर पूर्णपणे प्रगट होऊ शकलेले नाही. आता तर ते सत्य अधिक शक्तिसंपन्न होऊन आत्यंतिक उन्मुक्त होऊन ईश्वराचा प्रकाश सर्वत्र पसरविण्याची तयारी सुरू करीत आहे. अधिक व्यापक शक्ती प्रगट होण्याची आता वाट आहे.” पण हे सर्व कुठे घडेल, केव्हा घडेल, याचे रहस्य अजून कायमच आहे. कदाचित या विचार क्रांतीच्या रूपाने हे प्रगट होऊ शकेल. आपणास यासाठी आपले कार्य पूर्ण तत्परतेने
मनोयोगाने प्रत्यक्ष करून दाखविण्यासाठी कंबर कसून तयार व्हायला पाहिजे. तेव्हाच आपल्या या महान राष्ट्राचा सर्वांगीण विकास होणे संभव होऊ शकेल. तेव्हाच या देशाला खरे पूर्ण स्वातंत्र्य लाभू शकेल. अखंड ज्योती ऑगस्ट 2009