Home ऋषिचिंतन साधनेच्या बीजाला सिद्धीचे फळ

ऋषिचिंतन साधनेच्या बीजाला सिद्धीचे फळ

by

Loading

साधना हे बीज आहे व सिद्धी हा त्याचा परिणाम, त्याचे फळ आहे. बीजामध्ये उगवण्याची, अंकुरण्याची शक्ती असते. ते जर पोखरलेले असेल, किडलेले असेल तर उगवणार नाही. बी पेरण्याची कृती जरी ठीक असली तरी काही कारणामुळे त्याच्या अंकुरापासून वृक्ष बनण्याच्या मार्गात अडचण येऊ शकते. बीजामध्ये शक्ती असून देखील त्याची वृक्षामध्ये खरी परिणती होऊ न देणाऱ्या अशा काही अडचणी उत्पन्न होऊ शकतात.

साधनेपासून सिद्धी ही स्वाभाविक क्रिया आहे. बीजासून वृक्ष तयार होणे यासारखीच स्वाभविक प्रक्रिया आहे. केवळ बीज सक्षम असून भागत नाही. त्यासाठी योग्य जमीन, खत, पाणी, मशागत व सुरक्षा या सर्वांची गरज असते. ही साधना जर कमी पडली किंवा मिळाली नाही तर बी पेरणाऱ्याच्या आकांक्षा व बीजामध्ये असलेली क्षमता यांचे उपयुक्त फळ मिळू शकणार नाही.

साधना विज्ञानाचे जे माहात्म्य सांगण्यात येते व त्याची जी फलश्रुती सांगितली जाते, ते खरे होण्यासाठी साधकाच्या मनोभूमीमध्ये उत्कृष्ट चिंतनाचा सुपीकपणा व आदर्श चारित्र्याची आर्द्रता असणे आवश्यक आहे. केवळ कर्मकांड करून साधनेचे फळ मिळत नाही. कर्मकांड काही सर्वस्व नाही. नुसती पूजा करून देवाला प्रसन्न करून घेता येत नाही. या सर्व बाबींचे आपले महत्त्व आहे, पण त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर आधी साधकाला आपल्या व्यक्तिमत्त्वाची पातळी उंचवावी लागते. बीज पेरण्याच्या वेळीच ते बीज उगवू शकेल की नाही अशी खातरजमा करून घेण्यासाठी शेतकऱ्याने त्याचे नीट परीक्षण करायला पाहिजे व त्याला अंकुरण्या पासून तर फळ लागेपर्यंत त्याच्या ज्या ज्या वेळोवेळी गरजा असतील त्या नीट समजून त्या भागविणे हे जरूरीचे आहे. साधना हे सुद्धा एक प्रकारचे कृषी कार्य आहे. उच्च पातळीवरचे बीज पेरण्याचे कार्य आहे. त्याला अंकुर फुटण्यापासून फळे लागेपर्यंत नुसती उपासना तेवढी करून पुरेसे नाही तर जीवन साधना देखील करणे अपरिहार्य आहे. त्यापासून व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. तेव्हाच साधनेला सिद्धीची मधुर फळे लागण्याचा सुयोग येऊ शकेल.

– पं. श्रीराम शर्मा आचार्य

ऑक्टोबर 2009