देवाने दिलेला हा मानवाचा देह म्हणजे विज्ञान अर्थात जड पदार्थ किंवा पंचमहाभूते व त्याच बरोबर चैतन्यशक्ती म्हणजेच अध्यात्म किंवा आत्मतत्त्व यांनी मिळून बनलेला एक समन्वित समग्र घटक आहे. या विश्व – ब्रह्मांडात जे काही जड किंवा चैतन्य शक्तीचे रूप प्रत्यक्षात प्रगट झालेले आहे, त्या सर्वांचे अस्तित्व सूक्ष्म रूपात आपल्या या लहानशा देहात साठवलेले आहे. शास्त्रे सांगतात की दूरवरची ग्रह-नक्षत्रे, समुद्र, नदी, पर्वत यापासून तर देवशक्ती व आसुरी शक्ती या सर्वांचे आपल्या या मानवीदेहात अस्तित्व आहे. आपण आपल्या या देहाच्या द्वारे स्थूल रूपाने किंवा सूक्ष्म रूपाने, आपल्या चैतन्य शक्तीच्या द्वारे किंवा चिंतनाद्वारे आपल्या गुण-कर्म-स्वभाव यांच्या द्वारे किंवा आपले विचार, भावना इत्यादींच्या द्वारे दुसऱ्यांना जेवढे प्रभावित करतो, प्रेरित करतो त्याहून कितीतरी मोठ्या प्रमाणात आपण स्वतःच विश्वब्रह्मांडात व्यापलेल्या सूक्ष्मशक्तीच्या द्वारे प्रभावित होतो, प्रेरित होतो. याचे कारण हेच आहे की सृष्टीचा प्रत्येक घटक एकाच सूक्ष्म अशा संचार प्रणालीच्या तंत्राशी माळेत ओवलेल्या मण्यासारख्या गुंफला गेला आहे.
इंग्लंडचे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रो. फ्रेड हॉयल यांनी या विषयात खूप सखोल अभ्यास केला आहे व संशोधनकार्य केले आहे. जीवाच्या विकासासंबंधीच्या अत्याधुनिक संशोधनाचे प्रणेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. मानवविकासाला अंतरिक्षाचे साहाय्य या बाबतीत त्यांचे मत आहे की मनुष्य आज ज्या स्थितीला जाऊन पोचला आहे, त्याचा जो विकास झाला आहे, त्याचे फार मोठे व एकमात्र कारण अंतरिक्षातून मिळणाऱ्या प्रेरणा हेच आहे. त्या सूक्ष्मलहरींच्या स्वरूपात अवतरतात व ग्रहांच्या, पिंडांच्या परिस्थितीनुसार जीवसृष्टीमध्ये प्रवेश करतात. नव्या संशोधनामुळे हे मान्य होऊन चुकले आहे की पृथ्वीवर मनुष्याचे जे अस्तित्व आहे ते म्हणजे केवळ या ठिकाणी आढळणाऱ्या रासायनिक पदार्थांचा संयोग तेवढा नाही. एवढ्या घटकांपासून तर कृमी, जीवजंतू कीडे व सूक्ष्म जीव तेवढे उत्पन्न होऊ शकतात. वनस्पती, यापुढे लहान मोठे जीवाणू, त्याच्याही पुढे लहान मोठे प्राणिमात्र यांच्या पर्यंत फार तर यांचा विकास संभवू शकतो. पण त्यांच्यापासून मानवासारखी अद्भुत अशी रचना घडू शकेल अशी शक्यता मुळीच नाही. प्रो. हॉयल तर म्हणतात की पृथ्वीवर जे काही दिसत आहे ते सारे अंतरिक्षाचेच देणे आहे. सामान्य बुद्धीने विचार केला तर या ब्रह्मांडातील ग्रह, नक्षत्रे आपापले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आपापल्या भ्रमण कक्षे मध्ये फिरत आहेत व आपले निश्चित कार्य करीत आहेत. एवढेच आपणाला दिसते, कळून येते. त्यांचा इतर कोणाशी कसलाच अर्थाअर्थी संबंध दिसत नाही. वरवर विचार करतांना हे खरे वाटत असले तरी वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे. सर्व ग्रह-नक्षत्र एका ब्रह्मांडव्यापी सत्तेच्या सूत्राशी बांधले गेले आहेत, हे आता सिद्ध होऊन चुकले आहे. त्यांच्या आपल्या स्वत:च्या गतीचा व इतरांशी ताळमेळ ठेवून करीत असलेल्या भ्रमणगतीचा एकमेकांशी फार घनिष्ठ असा संबंध आहे, निश्चित असा दुवा आहे. पृथ्वीवरचे जीवन व तिथली जीवनावश्यक अशी परिस्थिती ही नुसती पृथ्वीची देणगी आहे असे नसून, त्यात इतर ग्रहांचे देखील योगदान आहे हे विज्ञानाचे शास्त्रज्ञ देखील आता मानायला लागले आहेत. आपल्या सूक्ष्म अशा संचार माध्यमाद्वारे ते त्यांना प्रभावित करतात, प्रेरित करतात व त्यांना प्रगतीच्या मार्गावर जायला उद्युक्त करतात.
विश्वप्रसिद्ध विज्ञानवेत्ते डॉ. गेल्डार्ड यांनी आपला संशोधन ग्रंथ “दि ह्यूमन सेन्सेस” यात म्हटले आहे मनुष्याच्या शरीरावर व मनावर ग्रहताऱ्यांच्या हालचालींचा प्रभाव नक्कीच पडत असतो. याचा पुरावा देण्यासाठी त्यांनी एक वैज्ञानिक प्रयोग करून दाखविला. आपल्या शरीराच्या कोशिका आपल्याला अनुकूल असलेल्या तत्त्वांना आकर्षित करतात व त्यांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा मूलभूत असा गुणधर्म आहे. हे त्यांचे निसर्गदत्त सामर्थ्य आहे असे त्यांनी सांगितले. शरीरातून बाहेर वाया गेलेली शक्ती किंवा ऊर्जा यांची पुन्हा भरपाई करून घेण्यासाठी याच आधारावर त्याच्या कोशिका प्रयत्न करीत असतात. यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. या गोष्टीचे परीक्षण करून दाखविले. शरीरातून काही जिवंत भाग कापून वेगळा ठेवण्यात आला व त्याच्या जवळच पण वेगळ्या पात्रात एक विषारी रासायनिक पदार्थ ठेवण्यात आला. या मांसाच्या तुकड्याचा शरीरातील मेंदूशी संपर्क तुटलेला असतांना देखील त्याच्या जिवंत कोशिका त्या विषारी द्रव्यापासून दूर जाण्यासाठी हालचाल करू लागल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढच्या भागात त्या विषारी द्रव्याच्या जागी दुसरे लाभदायक औषधी द्रव्य ठेवण्यात आले. त्याबरोबर त्या जिवंत कोशिका त्या द्रव्याकडे सहजगत्या सरकू लागल्याचे निदर्शनास आले. डॉ. गेल्डार्ड यांनी याचे कारण समजावून सांगितले. प्रत्येक कोशिका हे एक छोटे उपस्टेशन आहे. मुख्य स्टेशनाशी म्हणजे मेंदूच्या संचार यंत्रणेशी त्याचा नित्य संबंध असतो. मेंदूतून निघालेल्या कुठल्याही भावतरंगाचा परिणाम त्या कोशिकांवर होतो. त्याचे सूक्ष्म अणू ते ग्रहण करतात. त्याचप्रमाणे याच आधारावर मनुष्यावर अदृश्य शक्तींचाही प्रभाव पडत असतो. मनाच्या या चुंबक ‘शक्तीच्या द्वारे दूरवर असणाऱ्या ग्रह-नक्षत्र – पिंडाच्या शक्तिप्रवाहाला आपण सर्वजण आकर्षित करून घेत असतो व ती ऊर्जा आपण स्वीकार करीत असतो, धारण करीत असतो. त्यामुळे आपली अंतरंगातली शक्ती विकास पावण्याला मदत होते.
क्वांटम थिअरी मध्ये एक पूरक सिद्धांत आहे. पदार्थ आपल्या घन अवस्थेतून द्रव, वायू व प्लाझ्मा या अवस्थेत व त्याहीपुढे जाऊन प्रकाशाच्या कणात परिवर्तित होऊ शकतो. त्याच प्रमाणे उच्च पातळीवरचे चैतन्यकण पदार्थावस्थेत येऊन व्यक्त होऊ शकतात. प्रख्यात श्रेष्ठ विज्ञानवेत्ते हायजन बर्ग यांचे प्रतिपादन असे आहे की अंतराळात गेल्यावर एक स्थान असे येते की जिथे गेल्यावर पदार्थ स्वतः ऊर्जेमध्ये परिवर्तित होतो. अशा प्रकारे पदार्थाची व्याप्ती, त्याच्या प्रभावाची मर्यादा काळ आणि स्वरूप यात बांधली गेली आहे. त्याचप्रमाणे मनाचा व्याप अनुभूती, स्मृती आणि विचार यांच्या रूपात विस्तारलेला असतो. त्या त्या रूपात ते व्यक्त होत असते. या उपर देखील त्या दोहोंचा ‘परस्पर घनिष्ठ संबंध आहे व ते एकमेकांवर प्रभाव पाडीत असतात, त्यांचे परिवर्तन करू शकतात. याच आधारावर योगी, तपस्वी, सिद्ध, मुनी आपल्या उपासना, साधना, तपश्चर्या यांच्या बळावर ध्यान केन्द्रित करून ब्रह्मांडात व्याप्त असलेल्या शक्तीशी संबंध जोडतात व त्यापासून योग्य तो लाभ मिळवितात. त्याच बरोबर कृपाळू होऊन इतर लोकांना देखील औदार्याने मदत करीत असतात. या बाबतीत ए. सिंक्लेयर यांचे प्रसिद्ध पुस्तक “मेन्टल रेडिओ” वाचण्यासारखे आहे. त्यात लिहिले आहे, प्रत्येकाचा मेंदू म्हणजे एक शक्तिशाली मानसिक वायरलेस सेट आहे. त्याच्याद्वारे तो आपले विचार कुणा यंत्राच्या मदतीशिवाय दुसऱ्यांजवळ पाठवू शकतो व इतरांचे विचार एवढेच काय अंतराळात मुक्त विचरत असलेल्या विचार प्रवाहाचे तरंगांना पकडून त्यापासून लाभ मिळवू शकतो.
बंगलोर येथील प्रसिद्ध वैज्ञानिक संस्थेचे वरिष्ठ प्रोफेसर जी. एन. रामचंद्रन ह्यांनी मॉलेक्यूलर बायोफिजिक्स म्हणजे आण्विक जीवशास्त्रीय भौतिकशास्त्र या विषयावर फार मोठे संशोधन केले आहे. इंग्लंडच्या रॉयल अॅकेडमी सोसायटीने त्यांना एफ. आर. एस. या आपल्या सन्माननीय पदवीने विभूषित केले आहे. ते म्हणतात, विज्ञानशास्त्र, अध्यात्म, साहित्य आणि संगीत ही सर्व एकाच परमतत्त्वाची वेगवेगळी नावे आहेत. मेन्टल कॉम्यूनिकेशन या विषयी त्यांचे म्हणणे आहे की लहान मूल या पृथ्वीवर जन्म घेताक्षणीच त्याचा पहिला संबंध आपल्या जन्म देणाऱ्या आईशी होतो. हा संबंध मानसिक पातळीवरचा असतो व त्यासाठी त्याला काही करावे लागत नाही. हे एक प्रकारचे सूक्ष्म भावसंप्रेषण असते. हीच गोष्ट साहित्यात आपल्या वेगळ्या पध्दतीने व्यक्त केली जाते. एक वैज्ञानिक या भावसंप्रेषणाला विश्वव्यापक विचार लहरींच्या रूपात येणारा अनुभव असे सांगतो. कित्येकदा मनुष्य जेव्हा गहन चिंतनात बुडालेला असतो तेव्हा त्याला एकाएकी एखादा नवा विचार किंवा नवे सूत्र याचे आपोआप स्फुरण होते. याचा बाहेरच्या जगाशी किंवा स्थूल विश्वाशी कसलाच संबंध नसतो. कित्येकदा दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोग शाळांमध्ये संशोधन करीत असलेल्या दोन वैज्ञानिकांच्या डोक्यात एकच विचार एकाच क्षणी प्रगट होतो, असे दिसून आले आहे. त्यापैकी जो शास्त्रज्ञ त्या दिशेने लवकर कार्य करून आपला निष्कर्ष आधी प्रसिद्ध करतो त्याला त्याचे यश मिळते, त्याचे नाव होते. हे विचार प्रवाह कुठून येतात ? याचे उत्तर एकच आहे, सृष्टिकर्त्याच्या या विश्व ब्रह्मांडामध्ये सूक्ष्म संचाराची प्रणाली निरंतर कार्यशील आहे, सक्रिय आहे, हेच मानाव यास हवे.
अखंड ज्योती
ऑक्टोबर 2009