आपल्या कर्तबगारीने तो लॉर्ड बनला
टॉमसनचा जन्म टोरंटो, कॅनडा इथे झाला. तो एका न्हाव्याच्या घरी जन्माला आला. नामकरण झाले टॉमसन. जवळपासच्या शाळेत कसेबसे त्याचे शिक्षण झाले. शिवाय वरचे शिक्षण घेण्याची त्याची परिस्थिती नव्हती. आपल्या घरच्या गरिबीमुळे त्याला मोठ्या शिक्षण संस्थेत भरती होता आले नाही. पण त्याने आपली हिंमत मात्र सोडली नाही. गरीबीची परीस्थिती त्याच्या प्रतिभेच्या आड येऊ शकली नाही. त्याने आपल्या जीवनाचा मार्ग स्वतः शोधण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला. त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता. त्याची मूळची योग्यता काही कमी नव्हती. प्रतिभा कमी नव्हती. आपले यश कसे गाठायचे याचा तो सतत विचार करीत असे व जो मार्ग दिसेल त्याच्या दिशेने आपली सारी योग्यता ओतून तो काम करीत असे. एकाग्रपणे काम करायचे, जे काम हाताशी आले ते तत्परतेने पार पाडायचे आणि कुठलेही काम जबाबदारी समजून चांगल्या प्रकारे पूर्ण करायचे, हे त्याचे जीवनाचे तीन आधारभूत सूत्र म्हणून त्याने अंगीकारले होते. आयुष्यभर त्याने जे जे काम केले त्या त्या कामात या तीन आधारांमुळे त्याला सदोदित यश मिळत होते. तो जिथे जिथे जाई, तिथे तिथे आपल्या अंगच्या या सद्गुणांनी त्याला चांगला अवसर मिळे आणि लोकांकडून प्रोत्साहन मिळत जाई. त्यामुळे त्याचा प्रगतीचा मार्ग मोकळा होत जाई. हाताशी येईल ते काम करण्यात ‘त्याने कधी कसूर केली नाही किंवा दिरंगाई केली नाही. किंवा कुठल्याच कामाचे वैयर्थ्य त्याला वाटले नाही. त्याने फेरीवाल्याचे काम केले, तो क्लर्क बनला, मुनीम बनला, ”बागेत माळ्याचे काम सुद्धा करायला त्याने मागे पुढे पाहिले नाही. काम लहान असो की मोठे असो, तो मनापासून करीत असे, करीत असे. त्याचे लोकांशी वागणे सज्जनासारखे असायचे. त्याच्या या गुणांमुळेच त्याला एका मागोमाग एक अशी कामे मिळत राहिली. कधी केले नसेल असे काम देखील करण्यात त्याला आनंद वाटे व चुरशीने तो त्या कामाला सुरुवात करून चांगल्या प्रकारे ते पूर्ण करीत असे. एकामागून एक यश त्याच्या पायाशी चालत आले. त्याने आपल्या जीवनात नियमितपणा व मितव्यय या दोन गोष्टींना मोठे महत्त्व दिले होते. यांच्या आधारावर त्याने आपले दीर्घ आयुष्य घालविले व जीवनात त्याने अतोनात यश कमाविले. उत्तर आयुष्यात त्याचा सन्मान सरकारकडूनही करण्यात आला. त्याला लॉर्डची पदवी मिळाली. तो लॉर्ड टॉमसन झाला. तो 128 समाचार पत्रांचा मालक बनला, 15 रेडियो आणि टेलीव्हिजन स्टेशन तो चालवीत होता आणि विमान कंपनीचा मालक होता. त्याची गणना अब्जाधीश म्हणून होत असे. त्याने आपले आत्मचरित्र लिहून काढले. आपल्या जीवनात मिळालेल्या यशाचे श्रेय कुणाला आहे ? या प्रश्नाचा त्याने मोठा मार्मिक उहापोह केला होता. तो म्हणतो, माझी एवढी प्रगती झाली हा काही नशिबाचा खेळ नव्हे. माझ्या भाग्यामुळे मला ते सारे मिळाले, हे खरे नाही. मला कुणाची मदत मिळाली नाही किंवा कुणाच्या उपकाराच्या व कृपेच्या बळावर देखील मी एवढी मजल मारली नाही. माझ्या या यशाचे गमक एकच आहे. मी माझ्या आत दडलेली योग्यता, प्रतिभा, क्षमता व सामर्थ्य यांचा विकास करण्यासाठी भारी प्रयत्न केला. कुठल्याही परिस्थितीत मी हार मानली नाही आणि मनाचा तोल जाऊ दिला नाही. मी कामे करीत राहिलो, खपलो आणि मला यश मिळत गेले. हेच माझ्या उन्नतीचे रहस्य आहे.
वातावृत्तौ च योग्यायां.. तेभ्यः प्रोत्साहनं तथा ॥73-75॥ मुलांना चांगल्या वातावरणात राहण्याचा लाभ मिळायला हवा. उपयुक्त वातावरणात राहून त्यांचे पालनपोषण झाले, तर त्यांना चांगले श्रेष्ठ, योग्य व संस्कार संपन्न नागरिक बनता येईल. ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उच्च असेल, तर त्यांच्या विकासाची पातळी उंचावली जाईल आणि त्यांचे भविष्य उज्वल बनू शकेल. मुलांना सेवेच्या कार्यात देखील भाग घेण्यास लावावे. चांगल्या कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी इतरांना सहकार्य करावे, स्वयंसेवक बनावे, जेणेकरून त्यांना सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची व लोककल्याणाचे कार्य करण्याची गोडी निर्माण होईल. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे व आपल्या मुलांना त्याबद्दल प्रोत्साहन देत रहावे. ॥ 73-75॥
मुलांना चांगले वळण लावणे, त्यांना चांगले संस्कार , शिकविणे, हे आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर त्यांचा व्यवहारात कसा उपयोग करायचा यासाठी लोकांची सेवा ‘करण्याचे, लोककल्याणाच्या सार्वजनिक कार्यात स्वयंसेवक म्हणून भाग घेण्याचे व आपल्या गुणांचा योग्य तो लाभ इतरांना करवून देण्याचे प्रोत्साहन देण्याची व्यवस्था देखील करण्याची जबाबदारी पालकांचीच आहे. आपले कुटुंब, आपली शाळा, आपले अवतीभोवती असणारे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी, रोजच्या व्यवहारात ज्यांचा आपला संबंध येतो असे लोक आणि एकंदरीत संपूर्ण समाज ही एक प्रकारची कार्यशाळा आहे. या ठिकाणी चांगल्या प्रवृत्तींचे संवर्धन करण्यासाठी व्यासंग करायचा असतो. नुसत्या सिध्दान्ताचे चिंतन करून किंवा चांगल्या चांगल्या बोध वाक्यांची घोकंपट्टी करून किंवा पोपटपंची करून खरा व्यवहार येऊ शकत नाही. त्यासाठी समाजाला सम्मुख ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे. आपले सिध्दान्त, तत्त्वे, बोधवचने यांचा उपयोग प्रत्यक्ष आचरणात व्हायला पाहिजे. त्याचा व्यवहारात कसा उपयोग करावा हे कळायला पाहिजे. हे सारे शिकण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती, आवश्यक असे प्रसंग आवश्यक त्या संधी प्राप्त करून देणे व त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे हे पालकांचे उत्तरदायित्व आहे. जुलै 2008 अखंड ज्योती