कॉमर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा तास सुरू होता. धन, बँकेचे कार्य, हुंडी, प्रॉमिसरी नोट इत्यादीं विषयी प्राध्यापक मुलांना समजावून सांगत होते. त्याचवेळी अचानक तिथे प्रसिध्द उद्योगपती जॉन डी. रॉक फेलर यांचे आगमन झाले. ते सुध्दा प्राध्यापकांचे भाषण ऐकू लागले. प्राध्यापकांनी एका विद्यार्थ्याला विचारले, सांगा, प्रॉमिसरी नोट कशी लिहितात? तो विद्यार्थी आपल्या बाकावरून उठला, शिक्षकाच्या समोरच्या टेबलावरचा खडू त्याने उचलला आणि फळ्यावर सुवाच्य अक्षरात प्रॉमिसरी नोट लिहून दाखवू लागला. सर जॉन डी. रॉकफेलर त्या विद्यार्थ्याच्या बुध्दिकौशल्याने व समयसूचकतेने फारच प्रभावित झाले. मी कॉमर्स कॉलेजला दहा हजार डॉलर देण्याचा वायदा करतो असे म्हणून त्यांनी ताबडतोब खिशातून चेक बुक काढले आणि त्या संस्थेला दान म्हणून दहा हजार डॉलरचा चेक लिहून दिला.
त्या मुलाच्या समय सूचकतेमुळे एका धनाढ्य माणसाच्या अंतःकरणात सत्प्रवृत्ती जागली आणि त्याचा ताबडतोब पडताळा देखील दिसून आला.
अखण्ड ज्योती (मराठी)
जुलै 2008