Home संबंध यशस्वी कसे बनवाल?

संबंध यशस्वी कसे बनवाल?

by

Loading

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्याची आकांक्षा असते आणि तो याकरिता पूर्ण मनापासून प्रयत्नदेखील करीत असतो, तरीसुद्धा त्यात काही कसर राहूनच जाते व अपयश हाती पडते. कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी उत्तम प्रयत्न करण्याची गरज असते. यात कोणत्याही प्रकारची शिथिलता किंवा कमी केल्याने मनाला हवे तसे यश मिळण्यात आम्ही मागे राहत असतो. यश कोणत्याही एकाच दिशेने लाभत असेल तर त्याला अपूर्णच म्हणावे लागेल; कारण जीवनाचे अनेक पैलू असतात आणि जी व्यक्ती जीवनाच्या या वेगवेगळ्या आयामात चहूबाजूंनी यश प्राप्त करते, त्यात सामंजस्य स्थापित करते, तीच खऱ्या अर्थाने पूर्णतः यशस्वी व्यक्ती म्हटल्या जाऊ शकते. एखाद्या मनुष्याची जर व्यवसायात उत्तम प्रगती असेल, पण लोकांशी संबंध स्थापित करून ते निभविण्यात तो जर कमजोर असेल तर त्याची ती कमजोरी त्याच्या जीवनातील आनंद हिरावून घेण्यास कारणीभूत ठरू शकते. कुणी व्यक्ती जर लोकांसोबत संबंध निभविण्यात फार उत्तम असेल, पण दुसऱ्या एखाद्या बाबतीत कमजोर असेल तर त्याची ही कमी त्याच्या आनंदाला अपूर्णच ठेवील. आपल्या जीवनाचे सर्व पैलू हे परस्पर एकमेकांशी जुळलेले असतात व ते एकमेकांवर आपला प्रभाव टाकीत असतात. यातील एकही पैलू, अथवा आयामामध्ये काही असंतुलन उत्पन्न झाले अथवा सामंजस्याचा अभाव राहिला तर त्याच्या आयुष्याची गाडी अडखळते. म्हणून आपल्या जीवनात पूर्णत: यशस्वी होण्यासाठी जीवनाच्या सिद्धांतांना समजून घेणे आवश्यक आहे.तसेच त्या मानवी गुणांनासुद्धा आम्हाला आपल्या जीवनात धारण करावे लागेल, ज्यांचे अवलंबन केल्याने आमचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकते. जीवनात यशप्राप्तीसाठी काही महत्त्वाची सूत्रे आहेत, जसे आमचा मनोयोग व परिश्रम कोणतेही कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पुरेसे परिश्रम घेणे व पूर्ण मन लावून ते काम करणे, याला यशप्राप्तीची पहिली पायरी म्हणता येईल. कोणतेही काम करतांना ते कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, हे नीट समजले नसेल तरीसुद्धा त्या कामाची सुरुवात तर करायलाच हवी. लक्ष्य प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले की मग पुढचा मार्ग आपोआपच दिसू लागतो. कार्य करण्याची योग्य रीत व योग्य दिशा लक्षात येऊ लागते हे होताच आमच्या मनातील शंका-कुशंका आपोआपच मिटून जातात व स्वतःमधील आत्मविश्वास जागा होतो.

‘दि कॉन्फिडेन्स कोड’ या पुस्तकाचे लेखक केटी के आणि क्लेयर शिपमॅन लिहितात की माणसाला मिळणारे यश जेवढे त्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, तितकेच ते त्याच्या आत्मविश्वासावर देखील निर्भर असते. आत्मविश्वासाची कमी ही माणसाला निष्क्रिय बनवून टाकते.’ कामाची सुरुवात करणे व इच्छाशक्ति द्वारे मनुष्यात आत्मविश्वास जागा होतो व तोच त्याला जीवनात यश मिळवून देतो.

दुसऱ्यांची मदत करणे, त्यांची सेवा करणे हासुद्धा एक श्रेष्ठ मानवी गुण आहे, जो यश प्राप्त करण्यात त्याला मदतच करीत असतो. ज्या लोकांना दुसऱ्यांच्या मदतीची आकांक्षा असते, अशा लोकांची मदत केल्याने त्यांच्या मनात मदत करणाऱ्या प्रती कृतज्ञतेचा भाव जागृत होतो, त्यांच्या शुभेच्छा आम्हाला मिळतात आणि हे सर्व श्रेष्ठभाव व्यक्तीला यश प्राप्त करण्यात मदत करतात. एखादा मनुष्य आपल्या कामात अत्यंत कुशल असेल; पण त्याच्याविषयी सर्वांच्या मनात वाईट भाव असेल तर कोणीही त्याच्या सफलतेची कामना करणार नाही. या उलट जर कुण्या व्यक्तीप्रती लोकांच्या मनात चांगले भाव असतील तर त्यांचे ते चांगुलपणाचे भाव त्याला प्रार्थना आशीर्वादाच्या रूपाने मदत करीत असतात.

आपले जीवन म्हणजे मानवी संबंधांचा संसार आहे. येथे संबंध बनतात व बिघडतातसुद्धा. त्यामुळे आयुष्यात संबंधांचे धागे व्यवस्थितपणे पकडून ठेवणे, त्यांची जोपासना करणे व त्यांना बळकट करणे हे जास्त आवश्यक आहे. हे धागे जर मजबूत असतील, सुरक्षित असतील तर मनुष्याला त्याद्वारे एक मोठा आधार मिळत असतो व त्यामुळे मनातील असुरक्षिततेचा भाव दूर होतो. त्याला सतत अशी अनुभूती होत असते की आमच्यासोबत नेहमी कोणीतरी आहे. आपला म्हणावे असे कोणी सोबत आहे, ही आपलेपणाची भावना, हा बोध, मनुष्याला गहन आंतरिक समाधान व बळ प्रदान करीत असते. म्हणून आपुलकीच्या या परिघाला आक्रसू देता कामा नये, उलट त्याचा विस्तारच करायला हवा. त्याचबरोबर त्यात एवढे गुंतूनही राहू नये की त्यामुळे जीवनातील इतर पैलूंकडे दुर्लक्ष होईल. स्थापित संबंधाप्रती आमचे दायित्व व कर्तव्य काय आहे, याकडे पुरेपूर लक्ष ठेवीत त्यांना योग्यरित्या निभविणे आवश्यक आहे. या संबंधामध्ये आपण आपल्या सकारात्मक ऊर्जेने उजाळा देत असावे व त्याकरिता स्वतःला पूर्वाग्रहांपासून व अनाठायी अपेक्षेपासून मुक्त ठेवायला हवे. आयुष्यात संबंधांचे महत्त्व किती आहे, हे जाणण्यासाठी मानसशास्त्रज्ञ जॉर्ज वेलेंट यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील 268 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून ते या निष्कर्षाप्रत पोहोचले की करियर व आरोग्याच्या दृष्टीने यशस्वी होऊनसुद्धा मनुष्याजवळ त्यावर प्रेम करणाऱ्या संबंधांची कमी असेल तर तो सुखी राहू शकत नाही. त्यांच्या अध्ययनानुसार व्यक्तीचे सुख हे दोन गोष्टींवर अवलंबून असते, पहिले प्रेम व दुसरे आयुष्यात ते प्रेम टिकवून ठेवण्याचे मार्ग व पद्धती.

सर्वसामान्यपणे लोक दुसऱ्यांच्या संबंधामध्ये तणाव उत्पन्न करण्याचा प्रयत्न करून चांगल्या मित्रांना व लोकांना एकमेकांपासून दूर करण्याचा विचार करतात, जेणेकरून ते आयुष्यात प्रगती करू शकणार नाहीत. असा विचार करणे म्हणजे एका तऱ्हेची मनोविकृती आहे व त्यामुळे कुणाचेच हित साध्य होत नसते. चांगल्या लोकांना व चांगल्या मित्रांना जवळ आणण्याचा, त्यांचे संबंध दृढ करण्याचा, त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्या गेला तर त्यामुळे आमचे व दुसऱ्यांचे हित तर होतेच, शिवाय आम्ही ज्यांना मदत करतो, त्यांचा सहयोगसुद्धा आम्हाला मिळू लागतो.

संबंधाच्या बाबतीत सफलता व इतर बाबींमध्ये सफलता या दोन्ही मध्ये अंतर असते. आम्ही जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा उद्देश दुसऱ्यांना हरविणे व स्वतः जिंकणे हा असतो. स्पर्धेच्या शेवटच्या क्षणाला जसे आम्ही अंतिम ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतो व दुसऱ्यांच्या थोडे समोर राहून इतर सर्वांना मागे टाकून ती स्पर्धा जिंकून घेतो. पण संबंधाच्या बाबतीत आम्ही तेव्हाच विजयी होत असतो, जेव्हा आपण दुसऱ्यांकडून हरतो. त्यांच्या मागे राहतो. संबंध हे कधीही इतरांना जिंकून निभविता येत नाहीत. संबंधांना चांगले व निकोप ठेवण्यासाठी मनुष्याला लवचिक असावे लागते कधी-कधी झुकावेही लागते, बरेच काही सहन करावे लागते. दुसऱ्यांना जिंकू द्यावे लागते. दुसऱ्यांना विजयी करूनच आम्ही यात विजयी होऊ शकतो, हा काहीसा विरोधाभास असल्यासारखा वाटतो, पण संबंधाच्या बाबतीत हेच सत्य आहे.संबंधाच्या बाबतीत आपण स्वतःला जेवढे श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, इतरांवर अधिकार गाजविण्याचा, त्यांच्यावर दबाव बनविण्याचा प्रयत्न करतो, तेवढेच आपण त्यांचे पासून दूर होत जातो. संबंधाच्या बाबतीत आपुलकीची, नम्रतेची, समजूतदारपणाची, सेवा, संवेदना व सहानुभूतीची फार गरज असते. जो या बाबतीत जेवढा जास्त समृद्ध असेल तोच संबंधांचे हे धागेदोरे अधिक नीटपणे सांभाळू शकतो व यशस्वी होऊ शकतो. मे 2021 अखंड ज्योती (मराठी)