कधी कधी आपणाला कुणीतरी बोलावत आहे, आवाज देत आहे असा एकाएकी भास होतो. पण आजूबाजूला किंवा जवळपास कुणी दिसत नाही. दूरवर शोधूनही कुणाचा मागमूस लागत नाही. मग हा आवाज कुणी दिला? अशा प्रसंगी निश्चित समजून घ्यावे, ही हाक आपल्या अंतरात्म्याची आहे. तो आपणाला सांगत आहे माझा शोध घे, मला नीट पाहण्याचा आणि प्राप्त करण्याचा प्रयत्न कर शोधायचे म्हणजे काय ? आपण ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग नीट चोखाळलेला आहे की नाही? आपल्या आयुष्याचे जे उद्दिष्ट आपण ठरवले आहे त्याच्या दिशेने आपण नीट चालत आहोत की नाही? त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत की नाही ? स्वतःलाच हे बघायचे आहे, याचे परीक्षण करायचे आहे. आणि जर त्यात काही चूक होत असेल तर ती लगेच दुरूस्त करायची आहे. त्यात मुळीच वेळ लावायचा नाही.
ही हाक आपणाला जागरूक करण्यासाठी आहे. आपण आपल्या कर्तव्यात काही कसर करीत असू तर ती यापुढे करायची नाही, त्यात काही हलगर्जीपणा करीत असू तर तो वेळीच थांबवावा. पुढे असे होऊ नये याची नीट काळजी घ्यावी. स्वतः आपणच आपल्या आयुष्याचा पहारेकरी बनायला हवे. बाहेरचे कुणी शत्रू जर आपला किल्ला सर करायला येत असती तर त्याला वेळीच पायबंद घाला. आतल्या शत्रूपासून सावध राहा.
हा आवाज आपल्या हातातून मौल्यवान संधी निसटून जात आहे, महत्त्वाच्या संधी आपण वाया घालवीत आहोत. याविषयी आपणाला जागरूक करण्यासाठी ऐकायला येत आहे. हेच त्याचे खरे रहस्य आहे. अशीच चालढकल सुरू राहिली तर जे काही त्या देवाने मोठ्या औदार्याने आपणास अमूल्य रत्न भांडाराप्रमाणे विशिष्ट कामासाठी देऊन ठेवले आहे ते आपण गमावून बसू. तेव्हा ही हाक नीट ऐका आणि त्याच्या अनुरोधाने चालायला लागा. आपल्या जीवनाच्या कर्तव्यपथावर चला, यात कधी वाट चुकण्याची वेळ आलीच तर पुन्हा हा आतला आवाज ऐका. त्याची उपेक्षा करू नका, अवहेलना करू नका.
– पं. श्रीराम शर्मा आचार्य
अखण्ड ज्योती (मराठी) सप्टेंबर 2009