Home ऋषिचिंतन- विचारांमध्ये सृजनाची शक्ती

ऋषिचिंतन- विचारांमध्ये सृजनाची शक्ती

by

Loading

विधात्याने प्रत्येकाला जन्मतःच एक परिसाचा तुकडा उपहार म्हणून देऊन ठेवला आहे आणि तो सुद्धा असा की तो कुठे हरवण्याची किंवा त्याला कुणी हिसकावून घेऊन जाण्याची कधीच भीती नाही. या परिसाचे नाव आहे विचारशक्ती. ही विभूती आपल्या मेंदूच्या गुप्त तिजोरीत नीट सुरक्षित जपून ठेवण्यात आली आहे. तिथे कोणा चोराची धाव पोचू शकत नाही. जोवर ही शक्ती आपल्या

जवळ सुरक्षित आहे तोवर आपल्यावर कसल्याही प्रकारचे संकट ओढवण्याची मुळीच संभावना नाही. विचार म्हणजे फावल्या वेळी मनाचे मनोरंजन करण्याचे साधन आहे असे मानण्यात येते, पण वास्तविकपणे त्यांची सृजनात्मक शक्ती अनन्त आहे हे नीट समजून घ्यायला पाहिजे. हे विचार म्हणजे एक प्रकारचे चुंबक असतात. त्यांना आपल्याला अनुरूप व अनुकूल अशी परिस्थिती आपल्याकडे ओढून घेऊन आणण्याचे मोठे अलौकिक असे बळ असते. कुणालाही साधनांचा उपहार मिळाला असे दिसून येत नाही आणि खरेच कुणाला सहजगत्या ती मिळाली असतील तर ती साधने त्यांच्या जवळ टिकून राहू शकत नाहीत. आपण जे अन्न पोटात घालतो त्याचे पाचन करून त्यापासून शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक तो रस उत्पन्न करण्याचे व त्याचे रक्त बनविण्याचे कार्य हे आपले पोट करीत असते. त्याचप्रमाणे आपल्या मनात जो विचार प्रवाह सुरू असतो त्यापासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाची पातळी, आपला दर्जा निर्मित होत असतो. आपल्या अंगी त्याला अनुरूप असे सामर्थ्य उत्पन्न होते. त्यानुसार आपण जे कार्य करतो, जो पराक्रम करतो, पुरुषार्थ करतो त्याला योग्य ती दिशा देण्याचे कार्य या विचारशक्तीच्या आधारावरच होत असते.

आपली विचारशक्ती व त्याच्या अनुरोधाने आपले जसे व्यक्तिमत्त्व बनते व त्यामुळे जो पराक्रम आपण प्रत्यक्षात करतो, तो आपल्या चिंतनाचा व आपल्या सद्विचारांचाच परिणाम असतो. आपल्या विचारांची सृजनाची शक्ती समजून घेणे व त्यांचा विनियोग योग्य त्या मार्गाने करणे हे त्या परिसाचे कार्य आहे. या परिसामुळेच आपणांला हे कार्य करण्याचे भाग्य लाभू शकते.

– पं. श्रीराम शर्मा आचार्य

अखंड ज्योती

जुलै 2008