Home बालकांचा भावनात्मक विकास

बालकांचा भावनात्मक विकास

by

Loading

बालकांना प्रयत्नपूर्वक घडवावे लागते

प्रत्येक मूल भविष्यात आपल्या जीवनामध्ये मोठ्यातमोठे यश संपादन करू शकते, पण त्यासाठी त्याच्या पालकांनी त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पुरेपूर सहयोग देण्याची स्वतःची जबाबदारी मात्र पार पाडायला हवी. कोणतेच मूल जन्मजात महापुरुष नसते किंवा अयशस्वीही नसते. या दोन्ही स्थिती अशा गोष्टीच्या आधारावर निर्माण होतात, ज्या बालपणात त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी केल्या असतील. मुलांच्या सर्वांगीण विकासात आई-वडिलांद्वारे उपेक्षा होण्याचे एक कारण असे की बालकांचा विकास कशा प्रकारे केला जावा याचे त्यांना ज्ञान नसते. दुसरे कारण असे की आई-वडील आपल्या बालकांवर जीवापाड प्रेम करीत असल्यामुळे त्यास जगातील सर्वोत्कृष्ट समजतात ते पुढे महान व्यक्ती बनेल असे त्यांना वाटते. त्यांना आपल्या मोहापोटी बालकाच्या स्वाभाविक तसेच सर्वसामान्य बाल-लीलांमध्ये महापुरुषाची लक्षणे दिसू लागतात. या संदर्भात एका मोहमयी मातेचे अत्यंत रोचक उदाहरण आहे, आपला अनुभव सांगताना तिने स्वतःच म्हटले आहे

“जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या प्रिय कन्येस पहिल्या वर्गात टाकण्याण्यासाठी घेऊन गेले, तेव्हा मला असा विश्वास होता की माझी पाच वर्षांची मुलगी आपल्या चातुर्यपूर्ण गोष्टी करेल, तेव्हा तिच्या कुशाग्र बुद्धिवर सर्व शिक्षिका आश्चर्यचकित होऊन तिची प्रशंसा करू लागतील व अशी हुशार, गुणी मुलगी लाभली म्हणून माझे अभिनंदन करू लागतील, परंतु तेथे पोहचल्यावर मला माझ्या फाजील विश्वासाच्या पोकळपणावर खजिल व्हावे लागले. मला आश्चर्य वाटले की तेथे जेवढ्या माता आपल्या मुलींना दाखल करण्यासाठी आल्या होत्या त्या सर्वांचा समज आपापल्या मुलींबाबत माझ्या सारखाच होता. “

त्या मातेचा अनुभव स्पष्ट करतो की सर्व माता-पिता आपल्या मुलाच्या बाल-लीला पाहून हे जगातील सर्वात बुद्धिमान बालक आहे असे समजतात. हा पुढे नक्कीच मोठा माणूस बनेल. या गोड गैरसमजामुळेच ते देव आणि दैवाच्या भरवशावर त्यास आपोआप विकसित होण्यासाठी सोडून देतात व एखाद्या योजनेनुरूप वा आदर्शास डोळ्यापुढे ठेवून त्यास विकसित करण्यासाठी प्ररूत्न करीत नाहीत. ही आई-वडिलांची घोडचूक ठरते. कोणतेच बालक जन्मजात असफल किंवा विशेष नसते. ते एवढे संवेदनशील मात्र नक्कीच असते की आपल्या वडीलधाऱ्यांच्या प्रत्येक क्रियाकृत्याचे, व्यवहाराचे ते अतिशय बारकाईने निरीक्षण करून त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत राहते. मुले अनुकरण प्रिय असतात. तेव्हा ती पुढे अगदी आई-वडिलांप्रमाणेच बनतात. विचारी व सावध आई-वडील आपल्या बुद्धिहीन तसेच बावळट दिसणाऱ्या मुलांना प्रेमाने तसेच प्रयत्नपूर्वक अशा जीवनरेषेवर चालायला शिकवितात की ज्या योगे ती दिवसेंदिवस प्रगती करतील. या उलट बेसावध आई-वडील आपल्या अति विश्वासाने कुशाग्र बुद्धी, होतकरू, गुणी मुलांची उपेक्षा करून त्यांना कवडीमोल करून टाकतात. मुलांना उन्नत करण्यात अथवा आहे त्या स्थितीत खितपत पडत ठेवून त्यांच्या जीवनाचे मातेरे करण्यात आई वडिलांचे प्रयत्न व प्रमादाचे फार मोठे महत्त्व आहे. हे सत्य कोणत्याच पालकाने कोणत्याच परिस्थितीत नजरेआड करता कामा नये. मुलांना जन्म दिलाच आहे, तर आपल्या कर्तव्याचे, जबाबदारीचे महत्त्व ओळखून नीट पालन करावे, मुलांना महापुरुष बनण्यात मदत करावे. यामुळे स्वतःचा गौरव वाढेल, कुळाचे नाव होईल तसेच देश व समाजाचे हित होईल. प्रत्येक बालक महापुरुष बनू शकते, त्याच्यामध्ये अशा शक्ती व विभूती दडलेल्या असतात की त्यांची जागृती, नियोजन व उन्नयन व्यवस्थितपणे होणे गरजेचे असते आणि हे सर्व करण्याची जबाबदारी पालकांची असते. जगात एक नाही तर अशा हजारो महापुरुषांची उदाहरणे आहेत, जे प्रारंभी खूपच निर्बुद्ध वाटत, परंतु प्रोत्साहन आणि अनुकूल वातावरण प्राप्त होताच ते जगाचे जाज्ज्वल्यमान नक्षत्र बनले.

पुस्तक-बालकांचा भावनात्मक विकास लेखक- पं श्रीराम शर्मा आचार्य