कुणी कुणी विचारतात की अध्यात्म हे विज्ञान आहे की अंधविश्वास आहे ? तर मी त्यांना आधी हे विचारीन की अध्यात्माचा खरा मार्ग तुम्हाला माहीत आहे का ? तुम्हाला खरा मार्ग माहीत नाही म्हणूनच तुम्हाला ही काळजी वाटत असते. तुम्ही फक्त पूजा करता, फुले वाहता, घंटी वाजवता पण या सर्व देखाव्या व्यतिरिक्तही अध्यात्म वेगळे आहे, याची तुम्ही जाणीव ठेवायला हवी. स्वतःला वर उंच उठविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे. तुमचे मन त्यात लागत नसेल तर त्याला वळवा. मन लावून साधना करा. मग पहा देव तुमची मदत करतो की नाही ते! भगवान हा खरा आहे पण त्याला आपण प्रत्यक्ष पाहिले नाही. त्याची पडछाया, त्याचे प्रतिबिंब, त्याचा प्रतिध्वनी यांच्या रूपात अप्रत्यक्षपणे त्याला आपण पाहिला आहे. देवाला आम्ही कधी कुणा हत्तीवर किंवा घोड्यावर बसून जात आहे असे कधी पाहिले नाही. पण त्याला आम्ही पायलट म्हणून पाहिले आहे. आमचा बॉडीगार्ड म्हणून पाहिले आहे. हेच खरे विज्ञाननिष्ठ अध्यात्म आहे. हेच खरे अध्यात्म आहे. याचा परिणाम आम्ही स्वतः पाहिला आहे, एक संशोधक म्हणून पाहिला आहे.
लोकांना वाटते की देवाची आपण खुशामत केली, त्याची मनधरणी केली तर त्याचा फायदा आपणाला मिळू शकतो आणि हेच काय ते अध्यात्म होय. पण ही त्यांची समजूत चुकीची आहे. आधी आपली योग्यता सिध्द करावी लागते. देवांची देणगी कुणालाही कसलीही अट न ठेवता मिळते, हे काही खरे नाही. कुपात्र माणसाला तर काहीच मिळत नाही. आपण कर्मकांड जरी करीत असला व त्यामागे आपली भावना ठीक आहे, आपली खरी श्रध्दा आहे, तर त्याचे निश्चित फळ आपणास मिळेल, पण केवळ दाखविण्यापुरती किंवा कसली तरी दांभिकपणे करण्यात येणारी पूजा करीत असाल व त्यापासून मोठी आशा बाळगून असाल तर मात्र ते बरोबर नाही. साधनेमध्ये प्राण ओतायला पाहिजे. मग त्याचा खरा काय तो परिणाम पहायला मिळू शकेल.
-पं श्रीराम शर्मा आचार्य
अखंड ज्योती जुलै 2008