इ.स. 1913 या वर्षी दामोदर नदीला एवढा भयंकर पूर आला की बिहार प्रांताचा मोठा जमिनीचा भाग तिने ग्रासून टाकाला. त्याच वेळी बिहारच्या पुनपुन नदीला देखील असाच महापूर आला होता. लक्षावधी बीघा शेतजमीन पुराच्या पाण्याने वाहून गेली, नष्ट झाली. लोक, पशू, धनसंपत्ती यांचा किती नाश झाला याला काही सुमार राहिला नाही. राजेन्द्र प्रसाद त्या वेळी वकीली करीत होते. त्यांनी आपली वकिली सोडून देऊन आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पूर पीडितांच्या मदती साठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी ते धावून गेले. रात्रीच्या वेळी ते रेल्वेच्या कडेला किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनवर आराम करीत. त्यांचे मन दुसऱ्यांचे दुःख पाहून कातर होत असायचे. त्यांच्या कार्याला काही सीमा नव्हती. दिवस रात्र ते मेहनत करीत असत. ते काँग्रेसचे मोठे महत्त्वाचे पदाधिकारी झाले. वकिलीचा व्यवसाय देखील त्यांचा सुरूच होता. त्यांना 1934 मध्ये तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळी पुन्हा उत्तर बिहारमध्ये भयंकर विनाशकारक भूकंप आल्याची माहिती त्यांना तुरुंगात मिळाली. तुरुंगात असतांनाच त्यांनी सरकारला व देशाच्या सर्व नागरिकांना भूकंप पीडितांची मदत करण्यासाठी योग्य ते सामान पाठविण्याची अपील केली. सरकारने त्यांना सेवा कार्य करण्यासाठी तुरुंगातून सोडून दिले. त्यांची मेहनत करण्याची जिद्द, त्यांच्या साधेपणा, त्याग व तपश्चर्या यांचा प्रभाव साच्या देशावर पडला. खरे पाहता अशा थोर तपस्वी लोकांच्या सेवाभावनेमुळे व त्यांच्या निःस्पृह कार्यामुळेच आपल्या देशाला हे स्वातंत्र्य लाभले आहे.
अखंड ज्योती ऑगस्ट 2009